उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 22:51 IST2025-07-31T22:51:36+5:302025-07-31T22:51:49+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री असीम अरुण यांनी आपल्याच सचिवाची रवानगी तुरुंगात केल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री असीम अरुण यांनी आपल्याच सचिवाची रवानगी तुरुंगात केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या मुख्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर समाजकल्याण मंत्री असीम अरुण यांनी ही कारवाई केली आहे. पीडित महिलेने समाजकल्याणं मंत्र्यांचे खाजगी सचिव जयकिशन सिंह यांच्यावर छेडछाड आणि अश्लिल कृत्य केल्याचा आरोप केला होता. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर मंत्र्यांनी गोमतीनगरच्या एसएसओेंना बोलावून जयकिशन सिंह यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरू आहे.
उत्तर प्रदेशमधील समाज कल्याण विभागाचं मुख्यालय असलेल्या भागीदारी भवनमध्ये सेवेत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने मंत्री असीम अरुण यांची भेट घेऊन तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. तसेच मंत्र्यांचे खाजगी सचिव जयकिशन सिंह हे दीर्घकाळापासून त्रास देत होते, तसेच आपल्यासोबत अश्लिल वर्तन करायचे, असे सांगितले. तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन मंत्र्यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले.
माजी आयपीएस अधिकारी असलेल्या असीम अरुण यांनी आपल्या झीरो टॉलरन्स धोरणांतर्गत या प्रकरणी तात्काळ कारवाई केली. त्यांनी गोमतीनगर ठाण्याच्या एसएचओ यांना घटनास्थळी बोलावून जयकिशन सिंह यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.