राहत्या घराला लागली भीषण आग, महिलेसह तीन मुलांचा जिवंत जळून मृत्यू, तर चार जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 13:02 IST2025-01-19T13:02:22+5:302025-01-19T13:02:45+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका राहत्या घराला लागलेल्या भीषण आगीत महिलेसह तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

राहत्या घराला लागली भीषण आग, महिलेसह तीन मुलांचा जिवंत जळून मृत्यू, तर चार जण जखमी
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका राहत्या घराला लागलेल्या भीषण आगीत महिलेसह तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. येथील कंचन पार्क परिसरातील एका राहत्या घराला रविवार सकाळी भीषण आग लागली. आग लागली त्यावेळी घरात सुमारे ८ जण उपस्थित होते. त्यातील चार जणांनी घराबाहेर पडून आपले प्राण वाचवले. मात्र एक महिला आणि तीन मुलांना घराबाहेर पडता आले नाही. त्यांचा या भीष आगीत होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, ही दुर्घटना कशी घडली, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घरातील लोक झोपलेले असताना ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या आगीत चार जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर चार जण होरपळल्यामुळे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. प्राथमिक तपासामध्ये आगीमागचं कारण शॉर्ट सर्किट असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र तपासादरम्यान पोलिसांकडून इतर शक्यतांचीही पडताळणी केली जात आहे.
गाझियाबादचे सीएफओ राहुल पाल यांनी सांगितले की, आग लागलेल्या घरामध्ये काही लोक अडकलेले असल्याची माहिती जेव्हा आम्हाला मिळाली तेव्हा आम्ही या घराला लागून असलेल्या घराच्या भिंती तोडून आग शमवण्यास सुरुवात केली. तसेच घरात प्रवेश करून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. तर होरपळलेल्या इतर चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, आगीच्या या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली असून, त्यांनी मृतांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.