Tata Harrier EV Accident: तमिळनाडूत टाटा हॅरियर ईव्हीच्या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्हायरल पोस्टनुसार या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या एका मोडमध्ये बिघाड झाल्यामुळे ही घटना घडल्याचे म्हटलं जात आहे. तामिळनाडूमध्ये झालेल्या या अपघातात एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. व्हिडीओत एसयूव्ही 'समन मोड'मध्ये मागे जाताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओनुसार हॅरियर ईव्हीने एका माणसाला चिरडले. ही घटना तामिळनाडूतील अविनाशी येथे घडली, ज्यामध्ये पीडितेच्या डोक्याला दुखापत झाली होती. व्हिडिओमध्ये, ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडा असूनही, ड्रायव्हर केबिनमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच हॅरियर ईव्ही उतारावरून खाली जाताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:५३ वाजता घडली.
नवीन टाटा हॅरियर ईव्ही नुकतीच लाँच करण्यात आली आणि ती विविध फिचर्सनी भरलेली आहे. या नव्याने लाँच झालेल्या ईव्हीमध्ये समन मोड आहे जो एक ऑटोनॉमस फीचर आहे ज्याचा वापर करून तुम्ही गाडीत न बसता ती पुढे किंवा मागे हलवू शकता. हे फीचर खूप महत्त्वाचे दिसत असले तरी याच फीचरमुळे एका व्यक्तीचा जीव गेला.
पीडित व्यक्तीने गाडीत प्रवेश करुन ब्रेक लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, जड एसयूव्हीच्या वेगामुळे ती व्यक्ती खाली पडली आणि गाडी मागे जाताना त्याच्या पायावरून गेली. खाली पडताना त्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्या व्यक्तीला तात्काळ मदत केली आणि त्याला बाजूला केलं. त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले. कुटुंबियांना या घटनेनं जबर धक्का बसला.
नव्या गाडीत मृत व्यक्तीला सॉफ्टवेअरच्या समस्येचा सामना करावा लागला होता. ती मध्येच थांबली होती आणि चालू होत नव्हती. त्याला शोरूममध्ये फोन करावा लागला आणि गाडी सुरू करण्यास मदत मागवावी लागली. मात्र अचानक गाडी मागे गेली आणि ती व्यक्ती खाली कोसळली.
दरम्यान, या घटनेनंतर टाटा मोटर्सने अधिकृत निवेदन जारी केले आहे. "आम्हाला या दुःखद अपघाताची माहिती मिळाली आहे आणि झालेल्या नुकसानाबद्दल आम्हाला खूप दुःख झाले आहे. आमच्या शोकसंवेदना, प्रार्थना आणि मनापासून पाठिंबा मृतांच्या कुटुंबासोबत आहे. आम्ही सध्या सर्व संबंधित तथ्ये गोळा करत आहोत. ऑनलाइन/सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ पाहिल्यानंतर गुरुत्वाकर्षणामुळे गाडी उतारावरून घसरली असावी आणि एखाद्या अज्ञात वस्तूला धडकल्यानंतर ती उडाली असावी. यावरून असे दिसून येते की गाडीची मोटार चालू नव्हती. गाडी कुटुंबाकडेच आहे आणि घटनेपासून चालवली जात आहे आणि आम्हाला अद्याप त्याची तपासणी करण्याची संधी मिळालेली नाही," असं कंपनीने म्हटलं.