गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:44 IST2025-09-30T13:44:17+5:302025-09-30T13:44:55+5:30
ते मऊ, चांदीसारखे सफेद आणि चमकदार आहे, म्हणूनच त्याला " व्हाइट गोल्ड" असं म्हणतात. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रिचार्जेबल बॅटरीच्या निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो.

गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
नागौर - राजस्थानच्या नागौर जिल्ह्यामुळे आता भारताचीचीनमधून आयात होणाऱ्या बॅटरीवर निर्भरता संपणार आहे. यापुढे आपल्या देशातच मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने आणि रिचार्जेबल बॅटरीचं उत्पादन सुरू होणार आहे. बॅटरी बनवण्यासाठी उपयोगी येणारे लिथियम आता राजस्थानात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उद्योगाला नवी चालना मिळणार आहे आणि यामुळे राजस्थानला ना केवळ महसूल वाढणार आहे तर तिथे रोजगार वाढीचीही मोठी संधी आहे. व्हाइट गोल्ड नावानं प्रसिद्ध लिथियमचा मोठा साठा नागौर जिल्ह्यात सापडला आहे.
नागौर जिल्ह्यातील डेगाना भागात लिथियमचा मोठा साठा हाती लागला आहे. त्यामुळे भारताचीचीनवरील निर्भरता संपली आहे. नागौरच्या रेवंत पहाडी भागात लिथियमचा जो साठा सापडला तो जवळपास १४ मिलियन टनाइतका आहे. त्यामुळे राज्याच्या महसूलात आणि रोजगारात वाढ होणार आहे. या लिथियमचा वापर मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने आणि रिचार्जेबल बॅटरी उत्पादन करण्यासाठी केला जाणार आहे.
लिथियम उत्खननाची प्रक्रिया सुरू
डेगाना भागात सापडलेला लिथियमचा साठा राजस्थानला फायद्याचा ठरणार आहे. सध्या भारताला लिथियमसाठी चीनवर अवलंबून राहावे लागते. चीनमधून ७० ते ८० टक्के लिथियम आयात केले जाते. त्यामुळे लिथियमचा मोठा साठा देशातच मिळणे यामुळे क्रांती घडू शकते. केंद्रीय खाण मंत्रालयाने लिथियम खाणकामासाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत लिलाव कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख १ डिसेंबर २०२५ निश्चित केली आहे त्यानंतर लिथियम खाणकाम लिलाव प्रक्रिया सुरू होईल असं केंद्रीय खाण मंत्रालयाने म्हटलं.
चांदीसारखी सफेद अन् चमकदार
दरम्यान, लिथियम ज्याचे प्रतीक Li आहे, हा एक हलका धातू मानला जातो. शिवाय लिथियम अत्यंत प्रतिक्रियाशील असून हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर लगेच प्रज्वलित होऊ शकतो. ते मऊ, चांदीसारखे सफेद आणि चमकदार आहे, म्हणूनच त्याला " व्हाइट गोल्ड" असं म्हणतात. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रिचार्जेबल बॅटरीच्या निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो.