DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 22:59 IST2025-10-16T22:58:50+5:302025-10-16T22:59:42+5:30
Bribe Case: सीबीआयने केलेल्या कारवाईत पंजाब पोलिसांच्या एका डीआयजींच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली असून, या नोटा मोजण्यासाठी चक्क मशीन मागवावी लागली. आता सीबीआयने पंजाब पोलिस दलातील रोपड रेंजचे डीआयजी हरचरण सिंह भुल्लर यांना लाचखोरीच्या या प्रकरणात अटक केली आहे.

DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई
सीबीआयने केलेल्या कारवाईत पंजाबपोलिसांच्या एका डीआयजींच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली असून, या नोटा मोजण्यासाठी चक्क मशीन मागवावी लागली. आता सीबीआयने पंजाबपोलिस दलातील रोपड रेंजचे डीआयजी हरचरण सिंह भुल्लर यांना लाचखोरीच्या या प्रकरणात अटक केली आहे. सदर डीआयजींनी एका स्क्रॅप व्यावसायिकाकडून ८ लाख रुपयांची लाच आणि दरमहा सेवापानी म्हणून हप्ता मागितल्याचा आरोप आहे.
११ ऑक्टोबर रोजी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. डीआयजी हरचरण सिंह भुल्लर यांनी आपल्याका एका बनावट केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचा आणि एका मध्यस्थामार्फत ८ लाख रुपयांची लाच मागितल्याची फतेहगड येथील स्क्रॅप व्यावसायिक आकाश बट्टा यांनी सीबीआयकडे केली होती.
त्यानंतर सीबीआयने सापळा रचला आणि सेक्टर २१ चंडीगड येथे मध्यस्थ कृष्णू याला ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर सीबीआयने कृष्णू याला डीआयजींना फोनही करायला लावला. त्यानंतर डीआयजींनी रकमेला दुजोरा देत दोघांनाही ऑफीसमध्ये बोलावले. त्यानंतर सीबीआयच्या टीमने डीआयजी हरचरण भुल्लर यांना त्यांच्या ऑफीसमधूनच अटक केली.
त्यानंतर सीबीआयने डीआयजींच्या चंडीगडआणि रोपड येथील मालमत्तांवर टाकलेल्या धाडींमधून सुमारे ५ कोटी रुपये रोख, १.५ किलो सोनं, २२ आलिशान घड्याळं, दोन लक्झरी कारच्या चाव्या, निनावी मालमत्तांची कागदपत्रे आणि ४० लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आलं. याशिवाय त्यांच्याकडे एक डबल बॅरल गन, पिस्तूल, रिवॉल्व्हर आणि एअरगनही सापडली. तर मध्यस्थ कृष्णू याच्याकडे २१ लाख रुपये सापडले.