'६४ लोकांनी माझ्यावर अत्याचार केले'; 18 वर्षाच्या मुलीची आपबीती ऐकून पोलिसही सुन्न, 6 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:10 IST2025-01-11T14:08:14+5:302025-01-11T14:10:44+5:30
एका तरुणीवर ६४ जणांनी बलात्कार केल्याचे एक प्रकरण समोर आलं आहे. मुलीने जेव्हा सगळा घटनाक्रम सांगितला. हा सगळा प्रकार ऐकल्यावर पोलिसही सुन्न झाले. या प्रकरणात आता ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

'६४ लोकांनी माझ्यावर अत्याचार केले'; 18 वर्षाच्या मुलीची आपबीती ऐकून पोलिसही सुन्न, 6 जणांना अटक
एक १८ वर्षांची तरुणी पोलीस ठाण्यात आली. तिने पोलिसांकडे एक तक्रार दिली आणि तिच्यासोबत घडलेल्या क्रूर अत्याचारांची कहाणी सांगितली. सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, गेल्या ५ वर्षाच्या काळात तिच्यावर ६४ लोकांनी बलात्कार केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केरळमधील पथानामथिट्टा जिल्ह्यात ही घटना घडली असून, पोलीस प्रशासन हादरले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत आणि ६ लोकांना अटक केले आहे. केरळमधीलमहिला समाख्या सोसायटीच्या स्वयंसेवकांनी जिल्हा बाल कल्याण समितीला या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं.
६४ जणांकडून अत्याचाराचे प्रकरण कसं आलं समोर?
केरळ महिला समाख्या सोसायटीचे स्वयंसेवक दौरे करतात. एका दौऱ्यात त्यांची जिल्हास्तरीय खेळाडूशी भेट झाली. तिच्यासोबत स्वयंसेवकांनी संवाद साधला. चर्चेच्या ओघात तरुणीने गेल्या काही वर्षात तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराबाबत मौन सोडलं.
त्यानंतर स्वयंसेवकांनी जिल्हा बाल कल्याण समितीला याची माहिती दिली. पथानामथिट्टाचे बाल कल्याण समितीचे मुख्य वकील एन. राजीव यांनी सांगितले की, १५ दिवसांपूर्वी हे प्रकरण समितीसमोर आले.
राजीव यांनी सांगितले की, "आम्ही मुलीला सांगितले की, तिने तिच्या आईसोबत समितीसमोर यावे. तिचे समुपदेशन करण्यात आले. समुपदेशकासमोर तिने जे जे घडलं, ते सगळे सांगितले. तिने सांगितले की, ती १३ वर्षांची असल्यापासून लैगिंक शोषण केले जात आहे. तिने याबद्दल तिच्या आईलाही काहीही सांगितलेले नव्हते."
"तरुणी जिल्हास्तरीय खेळाडू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होत होती. त्याच काळात तिचे लैंगिक शोषण केले गेले. ती तिच्या व्यसनाधीन वडिलांचा मोबाईल वापरायची. यातील बहुतांश आरोपींची ओळख तिच्या वडिलांच्या मोबाईलमध्ये असलेल्या मोबाईल नंबरवरून झाली आहे. मोबाईल अनेक नंबर सेव्ह केलेले होते", राजीव यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षकांनी काय दिली माहिती?
पथानामथिट्टा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व्ही.जी. विनोद कुमार यांनी सांगितले, "दोन पोलीस ठाण्यात यासंबंधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गुन्ह्यात पाच लोकांना, तर दुसऱ्या एफआरआयमधील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासानंतर आणखी गुन्हे दाखल केले जातील. या प्रकरणाचा तपास एक पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी करत आहेत."
पीडितेचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि...
समोर आलेल्या माहितीनुसार, मुलगी १३ वर्षाची असताना एका शेजाऱ्यानेच तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला. शेजाऱ्याने पीडितेचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला. ज्या लोकांना हा व्हिडीओ मिळाला त्यांनी व्हिडीओ दाखवून धमकी देत अत्याचार केले.
'क्रीडा प्रशिक्षणासाठी गेल्यानंतरही माझ्यावर अत्याचार केले गेले', असेही पीडितेने पोलिसांना सांगितले. या प्रकरणात सहा लोकांना अटक केली आहे, तर १० पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.