मच्छिमाराने मासे पकडण्यासाठी नदीत जाळं टाकलं, पण सापडलं असं काही, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 15:52 IST2023-07-09T15:51:11+5:302023-07-09T15:52:35+5:30
Fisherman: राजस्थानमधील उदयपूरमधून जाणाऱ्या आयड नदीमध्ये मासे पकडण्यासाठी आलेल्या मच्छिमाराला एका भयानक अनुभवाचा सामना करावा लागला.

मच्छिमाराने मासे पकडण्यासाठी नदीत जाळं टाकलं, पण सापडलं असं काही, त्यानंतर...
तलावांचं शहर असलेल्या राजस्थानमधील उदयपूरमधून जाणाऱ्या आयड नदीमध्ये मासे पकडण्यासाठी आलेल्या मच्छिमाराला एका भयानक अनुभवाचा सामना करावा लागला. या मच्छिमाराने मासे पकडण्यासाठी नदीत फेकलेल्या जाळ्यात छोटी मगर अडकली. मगरीचं ते पिल्लू पाहून तो मच्छिमार थरथर कापत तिथून पळाला. त्यानंतर प्राणीप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली आणि जाळं कापून त्या मगरीच्या पिल्लाची सुटका केली. त्यानंतर त्या पिल्लाला बागदरा नेचर पार्कमध्ये सोडण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी एक मच्छिमार मासे पकडण्यासाठी आयड नदीवर आला होता. तिथे त्याने नदीत जाळं टाकलं. काही वेळानंतर त्याने जाळं मागे खेचलं. तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण त्या जाळ्यामध्ये मासळीऐवजी मगरीचं पिल्लू अडकलं होतं. मगरीला पाहून तो मच्छिमार तिथून पळून गेला.
जाळ्यामध्ये मगरीचं पिल्लू अडकलेलं असल्याचं पाहिल्यानंतर कुणीतरी प्राणीप्रेमी चमन सिंह यांना त्याची सूचना दिली. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ते जाळं कापून मगरीच्या पिल्लाला बाहेर काढलं. त्यानंतर त्या पिल्लाला सुरक्षितपणे नेचर पार्कमध्ये सोडण्यात आलं. या दरम्यान तिथे लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. लोकांनी नंतर या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले.