पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:04 IST2025-10-17T13:03:46+5:302025-10-17T13:04:32+5:30
Sudden Gamer Death: आयुष्य कधी कोणत्या वळणावर घेऊन जाईल याचा काहीच अंदाज नसतो. असाच काहीसा प्रकार अवघ्या १३ वर्षांच्या विवेकसोबत घडला आहे.

AI Generated Image
Lucknow Sudden Gamer Death: आयुष्य कधी कोणत्या वळणावर घेऊन जाईल याचा काहीच अंदाज नसतो. असाच काहीसा प्रकार अवघ्या १३ वर्षांच्या विवेकसोबत घडला आहे. शिक्षण आणि उदरनिर्वाहाच्या निमित्ताने कुटुंबासोबत लखनौमध्ये आलेल्या विवेकचा १३व्या वर्षी अकस्मात मृत्यू झाला. घरातील पलंगावर विवेक बेशुद्ध पडला होता आणि त्याच्या बाजूला मोबाईलवर फ्री फायर गेम (Free Fire Game) सुरू होता. तातडीने विवेकला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
विवेक मूळचा सीतपूरचा होता आणि आठ दिवसांपूर्वीच तो परमेश्वर एन्क्लेव्ह कॉलनीमध्ये राहायला आला होता. आपलं शिक्षण पूर्ण करतच विवेक छोटी मोठी काम देखील करत होता. मात्र दिवसभर मेहनत करणारा विवेक रात्रीच्या वेळी ऑनलाइन गेम्सच्या आहारी जायचा. पूर्ण रात्र तो व्हिडीओ गेम्स खेळायचा. या दरम्यान तो घरात कुणाशीच बोलायचा नाही. जर, इतर कुणी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तो प्रचंड संतापायचा. रागाच्या भरात वस्तू फेकून द्यायचा.
'त्या' दिवशी काय घडलं?
बुधवारी विवेकला सुट्टी होती, तो घरीच होता, नेहमीप्रमाणे तो त्याच्या मोबाईल फोनमध्ये हरवला होता. त्याची मोठी बहीण अंजू घरकामात व्यस्त होती. विवेक तिला म्हणाला, "दीदी, तू तुझे काम पूर्ण कर, मी एक गेम खेळतो." यानंतर अंजू कामाला निघून गेली. पण जेव्हा ती परत आली, तेव्हा विवेक बेडवर बेशुद्ध पडला होता, आणि त्याच्या मोबाईल स्क्रीनवर अजूनही फ्री फायर गेम चालू होता. अंजूने सुरुवातीला विचार केला की तो खेळता खेळता झोपी गेला असेल. तिने मोबाईल फोन बंद केला, तो चार्जवर ठेवला आणि विवेकच्या अंगावर ब्लँकेट टाकले. पण बराच वेळ त्याची हालचाल न दिसल्याने तिच्या मनावर शंकेची पाल चुकचुकली. तिने लगेच कुटुंबियांना फोन केला आणि त्यांनी त्याला लोहिया रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला
इंदिरा नगर पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. कुटुंबाने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. प्रत्येकालाच विवेकच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घ्यायचे आहे.