राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल, हिमंत बिस्वा सरमांच्या आदेशानंतर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 23:31 IST2024-01-23T23:30:42+5:302024-01-23T23:31:22+5:30
Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेवर निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये आहे.

राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल, हिमंत बिस्वा सरमांच्या आदेशानंतर कारवाई
भारत जोडो न्याय यात्रेवर निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये आहे. यादरम्यान राहुल गांधी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा समरा यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी घडत असून, आता मुख्यमंत्री सरमा यांनी दिलेल्या आदेशांनंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधींसह, के. सी. वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर नेत्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी हे आसाममध्ये हिमंत बिस्वा सरमा यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. सरमा यांच्या नेतृत्वाखाली आसामची अवस्था बिकट झाली आहे. तरुणांना रोजगार मिळत नाही आहेत. शेतकरी त्रस्त आहेत. आता आसाममध्ये न्याय यात्रेत अडथळे आणले जात आहेत. मी ज्या कुणाबरोबर बोलतोय, तो मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
दरम्यान, आता राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची माहिती हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, काँग्रेसच्या सदस्यांकडून आज झालेला हिंसाचार, चिथावणी, सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान, पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले याबाबत राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर लोकांविरोधात कलम १२० बी, १४३/१४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.