बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:34 IST2025-09-08T12:31:57+5:302025-09-08T12:34:17+5:30
गावातील शेकडो घरात मुस्लीम मतदारांची नावे जोडली. कुणाच्या घरात २ तर कुणाच्या घरात ८-१० नावे जोडण्यात आली आहेत.

बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
मुजफ्फरपूर - जिल्ह्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या साक्रा विधानसभा मतदारसंघातील काटेसर पंचायतीतील मोहनपूर भाग सध्या चर्चेत आहे. हा परिसर भूमिहार आणि वैश्य समाजाचा बालेकिल्ला मानला जातो. येथे सुमारे ५०० हिंदू कुटुंबे राहतात आणि एकही मुस्लिम कुटुंब नाही असं गावातील लोक सांगतात. परंतु अलीकडेच जेव्हा निवडणूक आयोगाने मतदार यादीत विशेष सुधारणा (SIR) केल्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर केली तेव्हा गावकरी आश्चर्य चकित झाले.
गावातील शेकडो घरात मुस्लीम मतदारांची नावे जोडली. कुणाच्या घरात २ तर कुणाच्या घरात ८-१० नावे जोडण्यात आली आहेत. आरोग्य विभागातून निवृत्त झालेले कर्मचारी कामेश्वर ठाकूर यांच्या कुटुंबात ६ सदस्य मतदार आहेत. परंतु यादीत त्यांच्या कुटुंबात आणखी २ मुस्लीम नावे जोडण्यात आली आहेत. त्याचप्रकारे मैथुर ठाकूर, दिलीप ठाकूर कुटुंबात ५ मतदार होते, त्यांच्या घरात आणखी ४ मुस्लीम मतदारांच्या नावांचा समावेश केला आहे. ही सामान्य चूक नाही तर मोठे षडयंत्र आहे असा आरोप कामेश्वर ठाकूर यांनी करत आमच्या कुटुंबात मुस्लीम नावे कशी जोडली हे न कळण्यासारखे आहे असं त्यांनी म्हटलं.
गावात मोठा कांड झाला...
गावात अन्य कुटुंबासोबतही हाच प्रकार घडला आहे. अनेक वर्ष गावात जी घरे बंद आहेत, ज्यांचे मालक गाव सोडून बाहेर राहायला गेलेत. त्यांच्या घरातही मुस्लीम मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. हे पूर्वनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे गावातील जमीन, वारसा आणि संपत्ती यांच्यावरही वाद निर्माण होऊ शकतो असा आरोप गावकऱ्यांनी केला.
बंद घराशी कशी जोडली नावे?
उमेश ठाकूर जे बँकेत नोकरी करतात. त्यामुळे त्यांचे गावाकडचे घर कायम बंद असते. परंतु त्यांच्या कुटुंबाच्या मतदार यादीत ८ मुस्लीम नावे जोडण्यात आली आहेत. तर दुसरीकडे मुन्द्रिका ठाकूर यांचे घरही वर्षोनुवर्ष बंद आहे. त्यांच्या घराभोवती झाडीझुडपे उगवली आहेत. तरीही मतदार यादीत मृत मुन्द्रिका यांच्यासह ८ मुस्लीम नावे दाखवण्यात आली आहेत. आमच्या परिसरात एकही मुस्लीम राहत नाही. तरीही प्रत्येक घरातील मतदार यादीत मुस्लीम नावे कशी जोडली असा प्रश्न गावकरी कृष्ण कुमार यांनी विचारला आहे.
निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
गावकऱ्यांनी प्रारूप मतदार यादीबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांनी गावचा दौरा केला परंतु अद्याप कुठलीही ठोस कार्यवाही नाही. जर मतदार यादीतील नावे काढली नाहीत, योग्य सुधारणा केली नाही तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. मोहनपूरा परिसर यासाठीही संवेदनशील आहे कारण २०२० च्या विधानसभा निवडणुकीत साक्रा मतदारसंघात तगडी लढत झाली होती. जेडीयू उमेदवार अशोक चौधरी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा १५३७ मतांनी पराभव केला होता. त्यात अशाप्रकारे मतदार यादीतील घोळ समोर आल्याने निवडणुकीच्या निकालांवर काही बदल करायचा आहे का असा संशयही गावकऱ्यांनी व्यक्त केला.