फ्रीजचा भीषण स्फोट होऊन घराला आग, ५७ वर्षीय महिलेचा आगीत जळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:01 IST2026-03-16T12:01:19+5:302026-03-16T12:01:45+5:30
लिंगियाडीह परिसरात रविवारी रात्री घरात असलेल्या फ्रीजचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत ५७ वर्षीय जया अग्रवाल या महिलेचा होरपळून मृत्यू झाला.

फ्रीजचा भीषण स्फोट होऊन घराला आग, ५७ वर्षीय महिलेचा आगीत जळून मृत्यू
छत्तीसगडमधील बिलासपूर येथून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. लिंगियाडीह परिसरात रविवारी रात्री घरात असलेल्या फ्रीजचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत ५७ वर्षीय जया अग्रवाल या महिलेचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून घरगुती उपकरणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जया अग्रवाल या लिंगियाडीह येथील साई मंदिराजवळ असलेल्या आपल्या घरात एकट्याच राहत होत्या. रविवारी रात्री सर्वत्र शांतता असताना अचानक त्यांच्या घरातील फ्रीजचा जोरदार स्फोट झाला. हा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक दहशतीने घराबाहेर आले. स्फोटानंतर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण घराला विळखा घातला.
सिलेंडरचा स्फोट झाल्याची भीती
धडाधड पेटणाऱ्या ज्वाळा पाहून शेजाऱ्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. सुरुवातीला हा गॅस सिलेंडरचा स्फोट असावा, असा अंदाज नागरिक वर्तवत होते. लोकांनी बादल्यांतून पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत सर्व काही खाक झाले होते.
मदतीसाठी वेळच मिळाला नाही
आग विझल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता, एका खोलीत जया अग्रवाल यांचा मृतदेह अत्यंत भीषण अवस्थेत आढळून आला. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा जागीच अंत झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
दुःखाचा डोंगर कोसळला
जया अग्रवाल यांच्या कुटुंबावर गेल्या काही दिवसांपासून संकटांची मालिका सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मानलेल्या भावाचे बेंगळुरू येथे उपचारादरम्यान निधन झाले होते. कुटुंबात अजून अंत्यसंस्कारानंतरचे विधी सुरू असतानाच ही दुसरी मोठी दुर्घटना घडल्याने नातेवाईक आणि परिचित सुन्न झाले आहेत.
फ्रीजचा स्फोट का झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रीजमधील कॉम्प्रेसरमध्ये तांत्रिक बिघाड किंवा गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बिलासपूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, शॉर्ट सर्किटचे काही कनेक्शन आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.