August Kranti Diwas: भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 9 ऑगस्टला घडली होती 'क्रांती'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 09:37 IST2018-08-09T09:29:55+5:302018-08-09T09:37:26+5:30

संपूर्ण देश पेटून उठल्यानं ब्रिटिशांचे धाबे दणाणले होते

9th august kranti din when whole india stood up against the british rulers | August Kranti Diwas: भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 9 ऑगस्टला घडली होती 'क्रांती'!

August Kranti Diwas: भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 9 ऑगस्टला घडली होती 'क्रांती'!

मुंबई: ऑगस्ट क्रांती दिनाला आज 76 वर्ष पूर्ण झाली आहेत. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी 'भारत छोडो'ची गर्जना केली. यानंतर देशभरात इंग्रजांविरोधात आंदोलनं सुरू झाली. ब्रिटिशांना हाकलण्यासाठी देशातील जनता पेटून उठली. गांधीजींच्या केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाल्यानं ब्रिटिशांची धाबे दणाणले. 

देशातील आंदोलनाची ब्रिटिशांना आदल्या रात्री मिळाल्यानं पहाटे पाच वाजताच महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बिर्ला हाऊसमधून ताब्यात घेण्यात आलं. 'आता प्रत्येकजण पुढारी होईल,' असा संदेश यावेळी गांधीजींनी दिला. ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. या सर्व नेते मंडळींना पुण्यात हलवण्यात आलं. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवण्यात आलं आणि त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. मात्र ब्रिटिश सरकारनं गुप्तता पाळूनही या घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगानं पसरली. गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आल्याची माहिती पसरली. 

नेत्यांची धरपकड झाल्यानं शांत होईल, अशी अपेक्षा ब्रिटिशांना होती. मात्र घडलं भलतंच. नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेलं. देशभर जागोजागी आंदोलनं, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारनं जमावबंदी लागू केली. पण लोक आता आदेशांना भीक घालत नव्हते. पोलिसांच्या लाठी हल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले. देशातील जनतेनं ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याची परिस्थिती होती. संपूर्ण देश पेटून उठला होता. दंगल जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. ब्रिटिशांकडून दडपशाही सुरू होती. पाहिजे त्याला करून विनाचौकशी अटक केली जात होती. सारा देश गोंधळलेल्या स्थितीत होता.

सरकारनं या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवलं. गांधीजींना याचा इन्कार केला आणि सरकारच्या निषेधार्थ 21 दिवसांचं उपोषण केलं. पण याचवेळी जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडं दोस्त राष्ट्रांच्या बाजूनं झुकत होतं. अमेरिका नावाची महासत्ता उदयास येत होती. अमेरिकेच्या मदतीनं ब्रिटिशांनी मुसंडी मारली. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. महायुद्धाच्या आघाडीवर दिलासा मिळाल्यानं ब्रिटिशांनी सर्व यंत्रणा भारतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वापरली आणि क्रांतीची तीव्रता हळूहळू कमी झाली. 
 

Web Title: 9th august kranti din when whole india stood up against the british rulers

टॅग्स :Indiaभारत