ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 16:51 IST2024-09-20T16:39:33+5:302024-09-20T16:51:13+5:30
हिमांशूला ऑनलाईन गेम्सचं इतकं व्यसन लागलं की त्याच्यावर आता तब्बल ९६ लाखांचं कर्ज झालं आहे. कर्जापायी त्याच्या आईने आणि भावाने त्याच्याशी बोलणं बंद केलं आहे.

ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
आजकाल टीव्हीवर तुम्हाला ऑनलाईन गेम्सच्या अनेक जाहिराती दिसत आहेत. यामध्ये काही रुपये गुंतवून कोणतीही व्यक्ती सहजपणे करोडपती होऊ शकते असा दावा करण्यात येतो. त्यामुळे लाखो लोक पैसे मिळतील या आशेने असे खेळ खेळतात. मात्र अनेकजण यामुळे सर्व काही गमावतात. हिमांशू मिश्रा नावाच्या तरुणासोबत अशीच घटना घडली. हिमांशूला ऑनलाईन गेम्सचं इतकं व्यसन लागलं की त्याच्यावर आता तब्बल ९६ लाखांचं कर्ज झालं आहे. कर्जापायी त्याच्या आईने आणि भावाने त्याच्याशी बोलणं बंद केलं आहे.
'न्यूज 18'च्या एका शोमध्ये आलेल्या हिमांशू मिश्राने आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. हिमांशूचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हिमांशूने सांगितलं की, त्याची आई शिक्षिका आहे आणि ९६ लाख रुपयांच्या कर्जामुळे ती त्याच्याशी बोलतही नाही. तरुणाने रडत रडत म्हटलं की, कुटुंबातील एकही सदस्य बोलत नाही. रस्त्यात मला काही झालं तरी कुटुंबीय मला भेटायला येणार नाहीत.
96 लाख का रुपए का कर्जा कर लिया हिमांशु मिश्रा ने Online Game खेलने के चक्कर में TV चैनलों पर प्रचार होता है ।।
— पवन भारद्वाज (@IAM_PAWAN_PB) September 20, 2024
ये बैटिंग लगवाने वाली कंपनिया मासूम लोगो को खा जायेगी ।।
जागरूक बनो ऐसी बैटिंग कंपनियों से बचो अब तो इनका प्रचार भी बड़े -बड़े स्टार खिलाड़ी कर रहे है ।। pic.twitter.com/C8w9DcimvH
एवढं कर्ज कुठून घेतलं असं विचारलं असता त्याने लोकांकडून पैसे घेतले आणि फ्रॉड केल्याचं सांगितलं. हे सर्व सांगताना तो रडत होता. हिमांशूने सांगितलं की, तो जेईई मेन्स क्वालिफाय आहे, पण बीटेकची फी तो जुगारात हरला. तरुणाने रडत रडत सांगितलं की, माझा भाऊ खूप चांगला आहे, पण तोही माझ्याशी बोलत नाही. ऑनलाईन गेममुळे सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे.
व्हिडिओमध्ये तरुणाने पुढे सांगितलं की, यूपीमध्ये एक पोलीस आहे, त्याने मला गेम खेळण्यासाठी बोलावलं. पण त्याचं पैशांचं नुकसान झालं. तर तेव्हा त्याने मला सात दिवस पोलीस ठाण्यात ठेवलं. हिमांशूचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी अशा ऑनलाईन गेमवर लवकरात लवकर बंदी घालण्याची मागणी केली आहे.