950 crores of Dallas-Reliance contract; Fuel Tanks will be made in Nagpur | दसॉल्ट-रिलायन्स करार ९०० कोटींचा; नागपुरात बनणार इंधनाच्या टाक्या
दसॉल्ट-रिलायन्स करार ९०० कोटींचा; नागपुरात बनणार इंधनाच्या टाक्या

- सोपान पांढरीपांडे 

नागपूर : राफेल लढाऊ विमान बनवणाऱ्या दसॉल्ट एव्हिएशन व अनिल अंबानींचा रिलायन्स एडीएजी समूह यांच्यातील ऑफसेट करार ३०,००० कोटींचा नसून ९०० कोटींचा आहे, असे ‘लोकमत’च्या तपासात आढळून आले आहे. दिल्लीत फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर यांनी पहिले राफेल विमान भारताला सप्टेंबर, २०१९ मध्ये दिले जाईल, अशी घोषणा रविवारी केली.

दसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेडने (डीआरएएल) येथील धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमध्ये फाल्कन एक्झिक्युटिव्ह जेटचे कॉकपिट बनविणे सुरू केले आहे. राफेलच्या कामाला सुरुवात झालेलीच नाही, हे समजल्याने ‘लोकमत’ने चौकशी केली असता, डीआरएएलला ३०,००० कोटींच्या आॅफसेट कराराचा ३ टक्के वाटा मिळाला आहे व ती कंपनी नागपुरात ९०० कोटीचे सुटे भाग व तेही फाल्कन विमानाचे बनविणार असल्याचे समोर आले. रिलायन्स डिफेन्समधील सूत्रांनी सांगितले की, फ्रान्स व भारत यांच्यातील राफेल
करार ६० हजार कोटींचा आहे. अटींप्रमाणे भारतीय कंपन्यांनी ५० टक्के, ३०,००० कोटींचे तयार सुटे भाग दसॉल्टला पाठवायचे आहेत. त्यासाठी दसॉल्टने जवळपास ७५ भारतीय कंपन्यांशी करार केले असून, त्यापैकी रिलायन्स एक आहे. त्यातून डीआरएएलची स्थापना झाली असून, तिच्याकडून ३ टक्के म्हणजे ९०० कोटींचे सुटे भाग घेतले जातील. त्यासाठी नागपुरात १०० दशलक्ष युरो (८५० कोटी
रुपये) गुंतवणूक ४ टप्प्यात होणार आहे.

या करारात फाल्कन विमानाचे सुटे भागही आहेत. डीआरएएलने पहिल्या टप्प्यात फाल्कनचे कॉकपिट शेल बनविणे सुुरू केले आहे. सप्टेंबरात सुरू होणाºया दुसºया टप्प्यात फाल्कनच्या पंखांतील इंधन टाक्या बनतील. मग विमानाचे नळकांडे तयार होईल व शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष विमानाची जोडणी होईल. याला साधारण दोन वर्षे लागतील.

रडार, दिशा निदर्शक निर्मितीत आणखी तीन कंपन्यांचा सहभाग
दसॉल्टने रडार व विमानाची दिशा-निर्देशक प्रणाली यासाठी ‘थॅलेस’ कंपनीशी, इंजिन व इलेक्ट्रॉनिक्ससाठी ‘साफरान’शी व क्षेपणास्त्रांसाठी ‘एमबीडीए’शी भागीदारी करार केले आहेत.

यापैकी ‘थॅलेस’ मिहानमध्येच रडार व एव्हिआॅनिक्स बनविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबतीत वारंवार प्रयत्न करूनही रिलायन्स डिफेन्सचे सीईओ राजेश धिंग्रा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: 950 crores of Dallas-Reliance contract; Fuel Tanks will be made in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.