२५ वर्षे जपलेला पिंपळ तोडल्याने ९० वर्षीय वृद्धेचा हंबरडा, केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:50 IST2025-10-13T12:50:12+5:302025-10-13T12:50:28+5:30
देवला बाई पटेल यांनी लावलेले व जोपासलेले झाड तोडले गेले असल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडाची अवस्था पाहून झाडाच्या बुंध्यावर डोके टेकवून रडू लागल्या.

२५ वर्षे जपलेला पिंपळ तोडल्याने ९० वर्षीय वृद्धेचा हंबरडा, केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल
खैरागड (छत्तीसगड) : तब्बल २५ वर्षांपूर्वी लावलेले पिंपळाचे झाड बेकायदा तोडण्यात आल्याने एका ९० वर्षीय महिलेने दुःखाने हंबरडा फोडला. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना खैरागड-चुईखादन-गंडाई जिल्ह्यातील सरगोंडी गावाच्या बाहेरील रस्त्यालगत घडली आहे. ५ ऑक्टोबरच्या रात्री हे झाड तोडण्यात आले होते.
देवला बाई पटेल यांनी लावलेले व जोपासलेले झाड तोडले गेले असल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडाची अवस्था पाहून झाडाच्या बुंध्यावर डोके टेकवून रडू लागल्या.
रिजिजू यांनी घेतली दखल
त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही तो ‘एक पेड़ माँ के नाम’ या हॅशटॅगसह शेअर करत “मन हेलावून टाकणारा प्रसंग” अशी प्रतिक्रिया दिली.
दोघांना अटक
गावकरी प्रमोद पटेल यांच्या तक्रारीवरून इम्रान मेमन आणि प्रकाश कोसरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. झाडाभोवती दोन लहान देऊळ बांधण्यात आले होते.
या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २९८ (धार्मिक स्थळाचे अपमान करण्याचा प्रयत्न) आणि २३८ (गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न) तसेच सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीपासून संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.
रात्रीत तोडले झाड
मेमनने नुकतेच झाडालगतची शेतजमीन खरेदी केली होती. रस्त्यावर थेट जाता यावे म्हणून झाड तोडण्याचा त्याचा प्रयत्न होता, असे पोलिसांनी सांगितले.
गावकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही आरोपींनी रात्रीच्या वेळी झाड कापले. त्यांनी वापरलेली कटर मशीन नदीत फेकून दिली, ती शोधण्यासाठी पाणबुड्यांना बोलावण्यात आले आहे. गावकऱ्यांनी झाड तोडलेल्या ठिकाणी धार्मिक विधी करून देवाची क्षमा मागितली आणि देवला बाईंच्या हस्ते नवीन पिंपळाचे रोप लावले.