बैलाने जोराची टक्कर मारुन 90 वर्षीय महिलेला हवेत उडवले, उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 17:25 IST2021-11-01T17:24:59+5:302021-11-01T17:25:15+5:30
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले आहे.

बैलाने जोराची टक्कर मारुन 90 वर्षीय महिलेला हवेत उडवले, उपचारादरम्यान मृत्यू
फरीदाबाद: हरीयाणाच्या फरिदाबादजवळच्या खेडी गावात एका बैलाने 90 वर्षीय महिलेला ठार केल्याची घटना घडली आहे. घराजवळ बसलेल्या महिलेला बैलाने आपल्या शिंगाने हवेत उडवल्याची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून यासाठी फरीदाबाद जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 90 वर्षीय महिला घराबाहेर उभी होती, तेवढ्यात एक बैल तिथे आला. यावेळी महिलेने आपल्या हातातल्या काठीने त्या बैलाला हकलण्याचा प्रयत्न केला, यानंतर त्या बैलाने आपल्या टोकदार शिंगाने त्या महिलेवर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, महिला हवेत उडून पडली.
उपचारादरम्यान मृत्यू
बैलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला आजुबाजुच्या लोकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलाचा नातू धीरेंद्र कुमार याने या घटनेसाठी महानगरपालिकेला जबाबदार धरलं आहे. घटनेनंतर पोलिसांनी शवविच्छेदन करुन महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी कलम 170 अन्वये कारवाई केली आहे.