९० टक्के विद्यार्थ्यांना मिळत नाही व्यावसायिक मार्गदर्शन! अभ्यासातून काढला निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:15 IST2025-09-28T13:14:59+5:302025-09-28T13:15:16+5:30
सात राज्यांतील तब्बल २१,२३९ विद्यार्थ्यांच्या अभ्यासातून काढला निष्कर्ष

९० टक्के विद्यार्थ्यांना मिळत नाही व्यावसायिक मार्गदर्शन! अभ्यासातून काढला निष्कर्ष
नवी दिल्ली : ‘करिअर काय करायचं?’ - हा प्रश्न दहावी-बारावीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना भेडसावतो. मात्र, उत्तर शोधायला आवश्यक ते व्यावसायिक मार्गदर्शनच जवळपास ९० टक्के भारतीय विद्यार्थ्यांना मिळत नाही, अशी धक्कादायक बाब संयुक्त राष्ट्र प्रायोजित एका अभ्यासातून पुढे आली आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात, पंजाब, कर्नाटक व राजस्थान या सात राज्यांतील १४ जिल्ह्यांमधील तब्बल २१,२३९ विद्यार्थ्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शालेय पातळीवरही ही दरी स्पष्ट दिसते. संसाधने चांगली असूनही खासगी ४१ टक्के, तर सरकारी शाळांतील ३५ टक्के विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या निवडीबाबत गोंधळलेले आहेत. ‘बॅकअप’ करिअर प्लॅन तयार करणारे विद्यार्थी २२
टक्के आहेत.
मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, तज्ज्ञांचे मत
आजच्या स्पर्धेच्या युगात करिअरच्या असंख्य वाटा उपलब्ध आहेत. परंतु, योग्य मार्गदर्शनाशिवाय विद्यार्थी आपली खरी क्षमता आणि आवड ओळखण्यात मागे पडतात. त्यामुळे व्यावसायिक मार्गदर्शन प्रणाली मजबूत करणे आणि शालेय स्तरावरच करिअरविषयक सल्ला देण्याची व्यवस्था उभारणे अत्यावश्यक असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
काय आहेत मुख्य अडथळे?
अभ्यासानुसार, विद्यार्थ्यांसमोर करिअर ठरविताना प्रामुख्याने खालील अडथळे निर्माण होतात, अचूक माहितीचा अभाव, करिअरविषयी एकूणच जागरूकतेचा अभाव, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचा दबाव,अभ्यासक्रमाचा खर्च आणि संधी याबाबतची अनिश्चितता आणि संभ्रम या प्रमुख अडचणी ठरत आहेत.
अभ्यासातील निष्कर्ष कोणते ?
> ३८ टक्के विद्यार्थी पुढे कोणत्या पातळीपर्यंत शिक्षण घ्यायचे, याबाबत गोंधळलेले आहेत.
> १० टक्के विद्यार्थ्यांनाच शिक्षणाचा खर्च किती येणार याची कल्पना आहे.
> ८१ टक्के विद्यार्थी करिअर नियोजनाशी निगडित अडचणींचा सामना करत आहेत.
या अडचणींमध्ये मर्यादित माहिती, आत्मजागरूकतेचा अभाव, नातलग, मित्रांचा दबाव, आर्थिक नियोजनाची गफलत याचा समावेश आहे.