ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 06:13 IST2025-10-10T06:12:49+5:302025-10-10T06:13:05+5:30
आणखी तीन नामवंत विद्यापीठे लवकरच येणार; आयात खर्चात घट, रोजगारांच्या नव्या संधी निर्माण, ‘कोंकण २०२५’ ब्रिटन-भारत संयुक्त नौदल सरावास प्रारंभ, १२६ जणांच्या जम्बो व्यापारी शिष्टमंडळाचा दौरा

ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारत- ब्रिटन या देशांदरम्यान संस्कृती, युवाशक्ती व शिक्षणक्षेत्र अशा त्रिसूत्रीला बळकटी देण्यासाठी ब्रिटनमधील प्रमुख नऊ विद्यापीठांचे कॅम्पस लवकरच भारतात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी गुरुवारी मुंबईत दिली. ब्रिटनमधील साऊथेम्प्टन विद्यापीठाने गुरुग्राम येथे विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचची मुहूर्तमेढ रोवल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.
राजभवनात झालेल्या कार्यक्रमात यूकेतील नऊ विद्यापीठांचे कुलगुरू, स्टार्मर उपस्थित होते. यावेळी भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ अँबर्डन, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल यांना कॅम्पस स्थापन करण्यासाठी इरादापत्रे हस्तांतरीत केली. तसेच, क्वीन्स युनिव्हर्सिटी ऑफ बेल्फास्ट, कोवेंट्री युनिव्हर्सिटी यांना गुजरातमधील गिफ्ट सिटी येथे कॅम्पस उघडण्या, मंजुरी दिली.
तंत्रज्ञान क्षेत्रात संयुक्त संशोधन व्यासपीठ : मोदी
भारत-ब्रिटनदरम्यान उद्योग, तंत्रज्ञान, संरक्षण आणि शिक्षण या क्षेत्रांत अनेक करार झाले. भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमांतर्गत तंत्रज्ञान क्षेत्रात संयुक्त संशोधनाचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
खनिजांसाठी औद्योगिक संघ आणि पुरवठा साखळी निरीक्षण यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. उभय देशांचे संबंध लोकशाही, स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य या मूल्यांवर आधारलेले आहेत.
दोन्ही देशात लष्करी प्रशिक्षणाचा करार झाला आहे. भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षक ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्समध्ये प्रशिक्षण देतील. कोकण २०२५’ या संयुक्त नौदल सरावाचाही प्रारंभ झाला
भारतीयांसाठी व्हिसा नियमात सूट नाही : व्हिसासंदर्भात कोणताही बदल केला जाणार नाही, असे स्टार्मर यांनी स्पष्ट केले आहे.
दोन्ही देशात लष्करी प्रशिक्षणाचा करार झाला आहे. भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षक ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्समध्ये प्रशिक्षण देतील. कोकण २०२५’ या संयुक्त नौदल सरावाचाही प्रारंभ झाला
भारतीयांसाठी व्हिसा नियमात सूट नाही : व्हिसासंदर्भात कोणताही बदल केला जाणार नाही, असे स्टार्मर यांनी स्पष्ट केले आहे.
२०४७पर्यंत भारत विकसित राष्ट्र : स्टार्मर
युक्रेन आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांचे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी कौतुक केले.
भारताने २०२८पर्यंत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय ठेवले आहे. तसेच भारताचे २०४७ पर्यंत विकसित राष्ट्राचा दर्जा मिळवण्याचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास स्टार्मर यांनी व्यक्त केला.
हिंदीतून दिवाळीच्या शुभेच्छा : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी त्यांचे निवेदन करताना ‘नमस्कार, नमस्कार दोस्तो’ अशी सुरुवात केली, तर अखेरीस दिवाळीच्या शुभेच्छाही हिंदीतून दिल्या.
भारतात तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण साध्य; ‘ फिनटेक’ मोदींचे भाष्य
गेल्या दशकात भारताने तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण साध्य केले आहे. आजचा भारत जगातील सर्वाधिक तंत्रज्ञानसमावेशक समाजांपैकी एक आहे. भारताने डिजिटल तंत्रज्ञान सर्व नागरिक आणि सर्व प्रदेशांपर्यंत पोहोचवले असून तेच आजच्या भारताच्या सुशासन मॉडेलचे मूळ आहे.
भारताचा यूपीआय, आधार पेमेंट सिस्टम, भारत बिल पे, डिजिलॉकर, डिजीयात्रा, गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस हे देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. भारताने विकसित केलेल्या मॉड्युलर ओपन सोर्स आयडेंटिटी फ्लॅटफॉर्म या प्रणालीचा वापर आज २५ हून अधिक देश करत आहेत.
बंगळुरूमध्ये कॅम्पसला परवानगी
या भेटीदरम्यान, भारतीय प्राधिकरणांनी लँकेशर युनिव्हर्सिटीला बंगळुरूमध्ये कॅम्पस उघडण्यासाठी इरादापत्र जारी केले तर, युनिव्हर्सिटी ऑफ सरेलादेखील गिफ्ट सिटीमध्ये कॅम्पस उघडण्यासाठी मान्यता दिली आहे.
यावेळी दोन्ही पंतप्रधानांनी आपापल्या नागरिकांना सुलभतेने प्रवास करता यावा यावर जोर दिला. सांस्कृतिक, कला व सृजन, पर्यटन, क्रीडा क्षेत्रांतले संबंध दृढ करण्यावर कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.