आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 07:56 IST2025-11-09T07:56:11+5:302025-11-09T07:56:30+5:30
African cheetah: भारतातील चित्ते पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत आफ्रिका खंडातील बोत्स्वाना या देशातून आणखी आठ चित्ते पकडण्यात आले असून, त्यांना लवकरच भारतात आणले जाणार आहे. एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने ही माहिती शनिवारी दिली.

आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
भोपाळ : भारतातील चित्ते पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत आफ्रिका खंडातील बोत्स्वाना या देशातून आणखी आठ चित्ते पकडण्यात आले असून, त्यांना लवकरच भारतात आणले जाणार आहे. एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने ही माहिती शनिवारी दिली. दोन नरांचा समावेश असलेल्या या चित्त्यांच्या समूहास भारतात पाठवण्यापूर्वी एक महिना विलगीकरणात ठेवून वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आंतरखंडीय स्थलांतरासाठी अनेक प्रक्रिया आवश्यक असतात. येणाऱ्या नाताळाच्या सुट्ट्यांमुळे हे चित्ते जानेवारीत भारतात आणले जातील. आधीच्या चित्त्यांप्रमाणे मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील सुविधेत त्यांना ठेवले जाईल." दरम्यान, द. आफ्रिकेच्या पाच सदस्यीय तज्ज्ञ पथकाने गुरुवारी कुनो राष्ट्रीय उद्यानाची तसेच मंदसौर-नीमच सीमेवरील गांधीसागर अभयारण्याची पाहणी केली. त्यांनी शुक्रवारीही परिस्थिती पाहिली व मग मायदेशी गेले.
द. आफ्रिकेच्या पथकाकडून केंद्र, राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक
- या पथकाने केंद्र सरकारच्या व मध्य प्रदेश सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पथकात अँथनी मिशेल, सॅम फेरेरा, ब्रेंट कव्हरडेल, कम चेट्टी आणि जॅनेट्टा सेलियर यांचा समावेश होता. भारतीय बाजूने एस. पी. यादव, शुभरंजन सेन व संजयन कुमार उपस्थित होते.
- सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२ चित्ते आणले होते. सध्या देशात २७ चित्ते आहेत, त्यापैकी २७ भारतात जन्मलेले आहेत. तर १० चित्त्यांचा मृत्यू झालेला आहे.