बिहारमध्ये बोट उलटल्यानं आठजणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 19:46 IST2018-04-29T19:37:33+5:302018-04-29T19:46:48+5:30
सातजणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

बिहारमध्ये बोट उलटल्यानं आठजणांचा मृत्यू
भागलपूर: बिहारमधील भागलपूरमध्ये बोट उलटून झालेल्या अपघातात आठजणांचा मृत्यू झाला आहे. कोसी नदीच्या पात्रात बोट उलटल्यानं हा अपघात झाला. बोटीतील सातजणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
भागलपूरच्या नवगछियामधील रामनगरचे 15 जण पूर्णिया येथे लग्नासाठी गेले होते. हे 15 जण मासेमारी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटीतून माघारी परतत होते. मात्र ही बोट लहान असल्यानं रामनगरच्या किनाऱ्यावर बोट उलटली. बोट बुडत असल्याचं लक्षात येताच किनाऱ्यावरील लोकांनी बोटीतील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सातजणांना किनाऱ्यावर आणलं. मात्र आठजणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या अपघाताची माहिती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकानंही (एनडीआरएफ) घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली.