काळजी घेत नाही म्हणून 73 वर्षीय आजोबांनी मागितला 65 वर्षीय पत्नीकडून घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 13:20 IST2017-08-12T13:18:00+5:302017-08-12T13:20:59+5:30
आपली पत्नी आपली काळजी घेत नाही, पहावं तेव्हा नातवंडांमध्ये व्यस्त असते, आपल्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करते असा आरोप अर्जदार आजोबांकडून करण्यात आला आहे.

काळजी घेत नाही म्हणून 73 वर्षीय आजोबांनी मागितला 65 वर्षीय पत्नीकडून घटस्फोट
गाजियाबाद, दि. 12 - लग्न झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष मतभेद झाल्याने पती - पत्नीकडून घटस्फोटासाठी अर्ज केले जातात. अनेकदा पत्नी व्यवस्थित लक्ष देत नाही, काळजी घेत नाही असा दावा पतीकडून केला जातो. जिल्हा न्यायालयातही असाच एक अर्ज आला असून पतीने पत्नीकडे घटस्फोट मागितला आहे. तसं यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, पण त्यांचं वय वाचलंत, तर मात्र नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण यामध्ये पतीचं वय आहे 73 वर्ष, तर त्यांच्या पत्नीचं वय आहे 63 वर्ष. आपली पत्नी आपली काळजी घेत नाही, पहावं तेव्हा नातवंडांमध्ये व्यस्त असते, आपल्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करते असा आरोप अर्जदार आजोबांकडून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार. घटस्फोटासाठी अर्ज करणारे आजोबा मुरादनगरचे रहिवासी आहेत. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ते मॅनेजर म्हणून काम करत होते. 23 वर्षापुर्वी ते निवृत्त झाले. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. तिघांचंही लग्न झालं आहे. आपल्या मुलाला व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली, मात्र आता कोणीच आपली काळजी घेत नसल्याचं ते सांगतात. बंगल्यातील तळमजल्यावर असलेल्या खोलीत मी एकटाच राहतो असंही त्यांनी सांगितलं आहे.
अर्जात आजोबांनी सांगितलं आहे की, 'त्यांची पत्नी पहावं तेव्हा नातवंडांसोबत खेळण्यात व्यस्त असते. ती आपल्या रुमपर्यंतही येत नाही. अशा परिस्थितीत एकट्याने वेळ घालवणं खूपच कठीण जातं. सकाळी साधा कोणी चहा देण्यासाठीही येत नाही. अशा परिस्थितीत कुटुंबासोबत एकत्र राहणं अशक्य आहे. माझ्या संपत्तीमधील वाटा पत्नीच्या नावे केला असून, यामुळे तीदेखील माझ्याशी बोलणं टाळत असते'. त्यांनी वकिलाच्या सहाय्याने न्यायालयात अर्ज करत पत्नीच्या नावे केलेली सर्व संपत्ती पुन्हा एकदा आपल्या नावे कऱण्याची मागणी केली आहे, सोबतच घटस्फोटासाठीही अर्ज केला आहे.
तिकडे वयस्कर आजींनी आपल्या पतीची मानसिक स्थिती योग्य नसल्याचा दावा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, 'मी माझ्या नातवंडांची काळजी घेण्यात व्यस्त असते. त्यांना मात्र मी नेहमी त्यांच्यासोबत असावं असं वाटत असतं. पण ते नेहमी शक्य नाही'.