थरूर यांच्यासह ७ खासदार करणार शिष्टमंडळांचे नेतृत्व, जगापुढे फाडणार पाकचा बुरखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 07:01 IST2025-05-18T07:00:31+5:302025-05-18T07:01:34+5:30

पक्षाने नाव न देताही शशी थरूर यांचा समावेश केल्याने काँग्रेस संतप्त, महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे...

7 MPs including Tharoor will lead delegations, will tear Pakistan's veil before the world | थरूर यांच्यासह ७ खासदार करणार शिष्टमंडळांचे नेतृत्व, जगापुढे फाडणार पाकचा बुरखा

थरूर यांच्यासह ७ खासदार करणार शिष्टमंडळांचे नेतृत्व, जगापुढे फाडणार पाकचा बुरखा

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध देशांमध्ये पाठविल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांची यादी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केंद्र सरकारने काँग्रेसची संमती न घेताच शशी थरूर यांचा शिष्टमंडळात समावेश केला. यामुळे काँग्रेसला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

केंद्र सरकारने या शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिंदेसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, जनता दल (यू)चे संजयकुमार झा आणि द्रमुक नेत्या कनिमोझी करुणानिधी यांच्या खांद्यावर टाकली आहे. या सात शिष्टमंडळामध्ये चार नेते सत्ताधारी एनडीएमधील असून तीन इंडिया आघाडीकडून आहेत.

सुरेश प्रभूंची झाली आठवण
शशी थरूर यांच्या निमित्ताने सुरेश प्रभू यांची आठवण 
झाली. पंतप्रधान 
नरेंद्र मोदी यांना 
सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात सामील करायचे होते. 
त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून प्रभू यांच्या नावाची शिफारस करण्यास सांगितले. 
परंतु, ठाकरे यांनी अनंत गिते यांचे नाव पाठविले. यानंतर मोदी यांनी भाजपच्या कोट्यातून प्रभू यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिले होते. 

ही सरकारची दुष्ट खेळी : काँग्रेस
सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या प्रमुखपदी शशी थरूर यांची केलेली निवड ही केंद्र सरकारने दुष्ट हेतूने केलेली खेळी आहे, असा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई, राज्यसभेचे खासदार डॉ. सय्यद नासीर हुसैन आणि लोकसभेचे सदस्य राजा ब्रार यांच्या नावाची शिफारस केली होती, असे जयराम रमेश यांनी म्हटले.

मात्र, काँग्रेसने सुचविले नव्हते तरी सरकारने शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी शशी थरूर यांची निवड केली. याउलट, काँग्रेसने सरकारला जी नावे दिली होती त्यातील एकाही नेत्याचा शिष्टमंडळात समाविष्ट करण्यात आले नाही. शिष्टमंडळासाठी काँग्रेसने जी नावे दिली आहेत, त्यात बदल होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
हा तर माझा सन्मान : शशी थरूर

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एक्सवर लिहिले की, पाच महत्त्वाच्या देशांमध्ये जाऊन भारताचे मत मांडण्यासाठी केंद्र सरकारने मला निमंत्रित केले हा मला सन्मान वाटतो. जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येईल व अशा ठिकाणी माझी गरज भासेल तेव्हा मी कधीही मागे हटणार नाही.

Web Title: 7 MPs including Tharoor will lead delegations, will tear Pakistan's veil before the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.