युद्ध सुरू असताना इस्रायलमध्ये कामासाठी गेले ६,७७४ भारतीय कामगार; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 08:15 IST2025-08-09T08:13:38+5:302025-08-09T08:15:26+5:30
सरकारने सांगितले की, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची याेग्य ती काळजी घेतली जात आहे.

युद्ध सुरू असताना इस्रायलमध्ये कामासाठी गेले ६,७७४ भारतीय कामगार; एकाचा मृत्यू
नवी दिल्ली : भारत आणि इस्रायल यांच्यात नोव्हेंबर २०२३मध्ये झालेल्या द्वीपक्षीय करारानुसार, १ जुलै २०२५पर्यंत एकूण ६,७७४ भारतीय कामगार इस्रायलमध्ये रोजगारासाठी गेले आहेत.
राज्यसभा प्रश्नोत्तरात गुरुवारी परराष्ट्र राज्य मंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी ही माहिती दिली. ऑक्टोबर २०२३मध्ये इस्रायल - हमास संघर्ष सुरू झाल्यानंतर भारतातून किती कामगार इस्रायलला गेले, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. सरकारने सांगितले की, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची याेग्य ती काळजी घेतली जात आहे.
रोजगारासाठी कोणत्या देशांत किती भारतीय?
सौदी अरेबिया २,००,७१३
यूएई ७१,६८७
कुवेत ४८,२१२
रशिया २७,०१०
इतर देश ६६,०००
६,७३० भारतीय कामगार बांधकाम क्षेत्रात
२२० कामगार भारतात परत आले असून, याचे प्रमुख कारण कौशल्याचा अभाव आणि भाषेची अडचण आहे.
४४ भारतीय देखभालकर्ता म्हणून कार्यरत आहेत.
अनेक भारतीय जखमी
इस्रायल गाझा संघर्षाच्या काळात मार्च २०२४मध्ये लेबनॉनकडून झालेल्या हल्ल्यात एका भारतीय कृषी कामगाराचा मृत्यू झाला. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझा येथून झालेल्या रॉकेट हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले होते आणि २ मार्च २०२४ रोजी लेबनॉनकडून झालेल्या हल्ल्यात आणखी दोन भारतीय जखमी झाले होते.
कधी झाला करार?
२०२२ मध्ये भारत – इस्रायल यांच्यात भारतीय नागरिकांना नेण्यासाठी चर्चा सुरू झाली. याच अंतर्गत नोव्हेंबर २०२३मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या.