आॅनलाईन मैत्रिणीकडून ६० लाखांचा गंडा, ३४ वर्षांचा व्यावसायिक अडकला जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 08:58 IST2018-04-16T08:58:01+5:302018-04-16T08:58:01+5:30
आॅनलाईनवर मैत्रीण झालेल्या महिलेच्या नादी लागून ३४ वर्षांच्या व्यावसायिकाने तब्बल ६० लाख रुपये गमावले.

आॅनलाईन मैत्रिणीकडून ६० लाखांचा गंडा, ३४ वर्षांचा व्यावसायिक अडकला जाळ्यात
बंगळुरू : आॅनलाईनवर मैत्रीण झालेल्या महिलेच्या नादी लागून ३४ वर्षांच्या व्यावसायिकाने तब्बल ६० लाख रुपये गमावले. सायबर क्राईम पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे की, व्यावसायिक सतीशने (बदललेले नाव) डेटिंग वेबसाईटवर प्रोफाईल ओपन केले. १८ जुलै, २०१७ रोजी सतीश या वेबसाईटवर ‘शोम्पा७६’ असा आयडी असलेल्या महिलेच्या संपर्कात आला. तिने त्याला स्वत:ची ओळख कोलकाताची अर्पिता, अशी करून दिली होती. किरकोळ स्वरूपाच्या गप्पा झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांचे मोबाईल फोन क्रमांक देऊन व्हॉटस्अॅपवरही गप्पा सुरू केल्या. एकमेकांच्या फोटोंचीही देवाण-घेवाण झाली.
काही दिवसांनी अर्पिताने माझे वडील रुग्णालयात दाखल असून, मला ३० हजार रुपयांची गरज असल्याचे सतीशला सांगितले. त्याने तिच्या बँक खात्यात पैसे पाठवले. काही दिवसांनी अर्पिताने आणखी पैशांची विनंती त्याला केली. यावेळी तिने कोलकातातील बीएम बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये माझ्या वडिलांना दाखल केल्याचे कारण सांगितले. १५ डिसेंबर, २०१७ आणि २३ जानेवारी, २०१८ या कालावधीत सतीशने आणखी पैसे पाठवले. त्याने १९ लाख रुपये रूपाली मजुमदार हिच्या खात्यात, तर ४०.७ लाख रुपये कुशन मजुमदारच्या खात्यात पाठवले. जेव्हा अर्पिताने सतीशच्या फोन्सला व मेसेजेस्ला उत्तरे देणे थांबवले त्यावेळी सतीशला संशय आला.
सायबर क्राईम पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारची फसवणूक फार काळापासून सुरू आहे. मॅट्रिमोनियल आणि डेटिंग वेबसाईटसमध्ये सायबर गुन्हेगार नातेसंबंधांसाठी (रिलेशनशिप) वयोवृद्ध किंवा वेगवेगळ्या झालेल्या स्त्री किंवा पुरुषांना शोधतात. हे गुन्हेगार स्वत:ला फार श्रीमंत कल्पक उद्योजक असल्याचे भासवतात व पीडितांची फसवणूक करून त्यांचे पैसे लुटतात, असे पोलीस अधिकारी म्हणाला.