कुख्यात गणेश उईकेसह ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 06:20 IST2025-12-26T06:20:08+5:302025-12-26T06:20:18+5:30
बेलघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुम्मा जंगलात बुधवारी रात्री सुरक्षा दलांसोबत झालेल्या गोळीबारात छत्तीसगडमधील दोन नक्षलवादी ठार झाले.

कुख्यात गणेश उईकेसह ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
भुवनेश्वर : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकींमध्ये कुख्यात नक्षलवादी नेता गणेश उईकेसह सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. मृतांमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. सीपीआय (माओअिस्ट) केंद्रीय समितीचा सदस्य असलेला उईकेला पकडण्यासाठी १.१ कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
बेलघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुम्मा जंगलात बुधवारी रात्री सुरक्षा दलांसोबत झालेल्या गोळीबारात छत्तीसगडमधील दोन नक्षलवादी ठार झाले. गुरुवारी सकाळी चकापाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात पुन्हा चकमक झाली, त्यात उईकेसह आणखी चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. चकापाड येथील चकमकीत ठार झालेल्या इतर तीन नक्षलवाद्यांमध्ये त्यात दोन महिलांचा समावेश असून त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांच्याकडून दोन इन्सास रायफल्स आणि एक ३०३ रायफल जप्त करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
गणेश उईके (६९ वर्षे) हा पक्का हनुमंतु, राजेश तिवारी, चामरू आणि रूपा या टोपणनावांनीही ओळखला जात होता. तो तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील पुल्लेमाला गावचा
रहिवासी होता.
सीपीआय (माओअिस्ट)च्या केंद्रीय समितीच्या सदस्याचा खात्मा हे ओडिशा पोलिसांसाठी मोठे यश आहे. यामुळे राज्यातील नक्षलवादी चळवळीचा कणा मोडला आहे.
- वाय. बी. खुरानिया, ओडिशाचे पोलिस महासंचालक
ओडिशा नक्षलवादमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, ओडिशातील ही कारवाई नक्षलमुक्त भारत होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. ओडिशा पूर्णपणे नक्षलवादमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद संपवण्याचा आमचा निर्धार आहे.