मतदार यादीतून ६.५ कोटी मतदारांची नावे बाद; उत्तर प्रदेशला बसला सर्वांत मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:20 IST2026-01-08T12:20:35+5:302026-01-08T12:20:35+5:30
९ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांत निवडणूक आयोगाची कारवाई

मतदार यादीतून ६.५ कोटी मतदारांची नावे बाद; उत्तर प्रदेशला बसला सर्वांत मोठा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या ‘मतदारयादी पुनरिक्षण’ (एसआयआर) मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ९ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांच्या मतदार यादीतून तब्बल ६.५ कोटी मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. यानंतर संबंधित १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदारांची संख्या ५०.९० कोटींवरून कमी होऊन ४४.४० कोटींवर आली आहे.
४ नोव्हेंबरपासून अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्वीप, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, पुडुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश व प.बंगालमध्ये मोहिमेचा दुसरा टप्पा राबवला जात आहे.
नावे वगळण्याची कारणे
ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांचा समावेश ‘एएसडी’ म्हणजेच अनुपस्थित (अबसेंट), स्थलांतरित (शिफ्टेड) आणि मृत किंवा दुबार (डेड/ड्युप्लिकेट) या श्रेणीत करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात प्रसिद्ध झालेल्या मसुदा यादीत २.८९ कोटी मतदारांना वगळण्यात आले आहे. पूर्वी १५.४४ कोटी मतदार असलेल्या या राज्यात आता १२.५५ कोटी मतदार उरले आहेत.
लखनौ, गाझियाबादमध्ये सर्वाधिक मतदार वगळले
उत्तर प्रदेशातील लखनौ, गाझियाबाद, बलरामपूर आणि कानपूर नगर या जिल्ह्यांतून एसआयआरदरम्यान मतदार अर्ज सादर न करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, अशी अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
राज्यातील बुंदेलखंड भागातील ललितपूर, हमीरपूर, महोबा, झांसी आणि चित्रकूट यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मसुदा यादीतून सर्वात कमी नावे वगळण्यात आली आहेत.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले, लखनौमध्ये ३०.०४ टक्के अर्ज जमा झाले नाहीत. १२ लाख मतदारांचा यात समावेश आहे. २८.८३ टक्के अर्ज गाझियाबादमध्ये जमा झाले नाहीत. ५.८३ लाख मतदारांचा समावेश आहे.