भाजपाची 'पॉवर' वाढली; आता १२ राज्यांमध्ये 'आत्मनिर्भर' सत्ता, काँग्रेसकडे उरली ३ राज्यं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 16:28 IST2023-12-03T16:27:04+5:302023-12-03T16:28:17+5:30
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप सत्ता काबीज करत आहे, तर तेलंगणात पहिल्यांदाच काँग्रेसची सत्ता येणार आहे.

भाजपाची 'पॉवर' वाढली; आता १२ राज्यांमध्ये 'आत्मनिर्भर' सत्ता, काँग्रेसकडे उरली ३ राज्यं
5 state assembly election 2023: मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यातील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने एकहाती सत्ता खेचून आणली आहे, तर तेलंगणात पहिल्यांदाच काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. या विजयासह भाजपकडे देशभरातील 12 राज्यांचे नेतृत्व असेल, तर काँग्रेसकडे फक्त 3 राज्ये उरतील.
राजस्थान, मध्य प्रदेश, आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाची विजयाकडे वाटचाल होताना दिसत आहे. विजयाची औपचारिक घोषणा झाल्यानंतर भाजपची देशातील 12 राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता असेल. दुसरीकडे, राजस्थान आणि छत्तीसगडच्या पराभवानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसकडे केवळ तीन राज्यांची सत्ता राहणार आहे.
काँग्रेसचा 'नायक', तेलंगणात एकहाती सत्ता खेचून आणणारे रेवंत रेड्डी कोण आहेत? जाणून घ्या...
आजच्या निकालानंतर दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार सत्तेत असणारा आम आदमी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असेल. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात सत्तेवर आहे. आजच्या विजयानंतर राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही भाजपचे कमळ फुलणार आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या 12 राज्यांव्यतिरिक्त महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीममध्येही भाजप इतर पक्षासोबत सत्तेत आहे. दुसरीकडे, काँग्रेसची सत्ता फक्त हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभव होत असला तरी, काँग्रेसने तेलंगणाच्या रुपात दक्षिणेत आणखी एक राज्य काबीज केले आहे.
केजरीवालांच्या नेतृत्वात 'आपने' 200 पेक्षा जास्त जागा लढवल्या, तिन्ही राज्यात मिळाला भोपळा...
याशिवाय बिहार आणि झारखंडमधील सत्ताधारी आघाडीत काँग्रेसचा समावेश आहे. तामिळनाडूमध्ये काँग्रेस द्रमुकचा मित्रपक्ष नक्कीच आहे, पण तो राज्य सरकारचा भाग नाही. सध्या भारतात सहा राष्ट्रीय पक्ष भाजप, काँग्रेस, बसपा, सीपीएम, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी आहेत. अरुणाचल प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि आंध्र प्रदेशमध्ये पुढील विधानसभा निवडणुका 2024 मध्ये होणार आहेत. त्यात कोणता पक्ष बाजी मारणार, हे येणाऱ्या काळात कळेल.