४४% शहरे प्रदूषणाच्या विळख्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 09:42 IST2026-01-13T09:42:41+5:302026-01-13T09:42:41+5:30
१७८७शहरांमध्ये हवेचा दर्जा पीएम २.५ मानकापेक्षा अधिक

४४% शहरे प्रदूषणाच्या विळख्यात
नवी दिल्ली: भारतातील ४४ टक्के शहरे दीर्घकालीन वायुप्रदूषणाचा सामना करत आहेत. दीर्घकालीन प्रदूषण ही वायुप्रदूषणाच्या प्रमाणात जी तात्कालिक वाढ दिसते त्यापेक्षा अधिक धोकादायक आहे असे सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अॅण्ड क्लीन एअर (सीआरइए) संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे
सीआरइएने २०१९ ते २०२४ या कालावधीत देशातील ४०४१ शहरांमधील हवेच्या दर्जाच्या पीएम २.५ या पातळीचा अभ्यास केला. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यातील १७८७शहरांमध्ये हवेचा दर्जा पीएम २.५ मानकापेक्षा अधिक होता. सध्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या अंतर्गत केवळ १३० शहरे समाविष्ट आहेत. त्यापैकी ६७शहरे सातत्याने मानकांपर्यंत न पोहोचणाऱ्या शहरांत मोडतात. त्यामुळे एनसीएपी हा कार्यक्रम देशातील ४ टक्के दीर्घकाळ प्रदूषित शहरांवरच लक्ष केंद्रित करत असल्याचे सीआरइएने म्हटले.
बर्नीहाट देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर
२०२५ या वर्षात आसाममधील बर्नीहाट हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. त्यानंतर दिल्ली, गाझियाबाद यांचा क्रमांक लागतो. या शहरांमध्ये पीएम २.५ पातळी अनुक्रमे १०० यूजी/एम३, २६ यूजी/एम आणि ९३ यूजी/एम इतकी नोंदवण्यात आली आहे. नोएडा, गुरुग्राम, ग्रेटर नोएडा, भिवाडी, हाजीपूर, मुजफ्फरनगर, हापूर ही शहरेही सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत समाविष्ट आहेत. तसेच उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक नॉन-अटेनमेंट शहरे आहेत.