43 people have lost their lives in the fire incident in Delhi | दिल्ली आग : अरुंद गल्ली आणि अपुऱ्या माहितीने घेतले 43 बळी 

दिल्ली आग : अरुंद गल्ली आणि अपुऱ्या माहितीने घेतले 43 बळी 

नवी दिल्ली - दिल्लीतील अनाज मंडी परिसरात झालेल्या भीषण अग्नितांडवात 43 जाणांचा बळी गेला आहे. दरम्यान, या दुर्घटनेची तीव्रता वाढण्यास घटनास्थळावरील परिस्थिती आणि चुकीची माहितीही कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. राणी झांशी रोडवरील ज्या अनाज मंडी परिसरात ही आग लागली तेथील गल्लीबोळ फारच अरुंद आहेत. तसेच या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने अग्निशमन दलाला  आग शमवण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत होते. तसेच आगीसंदर्भातील माहितीसुद्धा अपूर्ण दिली गेल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्हाला केवळ आग लागल्याचे सांगण्यात आले. मात्र त्या इमारतीमध्ये लोक अडकले असल्याचे सांगण्यात आले नव्हते, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान, इमारतीच्या मालकाच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या आगीत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. 

 दिल्लीतील राणी झांशी रोडवरील अनाज मंडी परिसरात आज पहाटे हे भीषण अग्नितांडव घडले. या परिसरात असलेल्या एका तीन मजली बेकरीतील वरच्या मजल्यावर पहाटे पाच वाजता आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. हा भाग दाटीवाटीचा असल्याने मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत होते. तसेच ही आग आणि धुराचे लोळ आजुबाजूच्या इमारतीत पसरल्याने अनेकजण धुरामध्ये गुदरमले. 

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे बंबही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले. मात्र बघता बघता आग वाढत गेली. दरम्यान, अग्निशमन दलाने सुमारे 50 हून अधिक जणांना वाचवले. तर आगीत जखमी झालेल्यांना आरएमएल, एलएनजेपी, हिंदू राव आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 43 people have lost their lives in the fire incident in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.