४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:06 IST2025-11-10T13:04:10+5:302025-11-10T13:06:59+5:30
Vande Bharat Express News: वंदे भारत ट्रेन दिवसेंदिवस देशभरात अधिक लोकप्रिय होत चालली आहे. अधिक तिकीट दर असूनही, प्रवासी संख्येत मोठी वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे.

४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
Vande Bharat Express News: आताच्या घडीला वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेची सर्वांत लोकप्रिय असलेली ट्रेन आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार नव्या वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले. यानंतर आता देशभरातील वंदे भारत ट्रेनच्या सेवा १६० वर पोहोचल्या असल्याचे म्हटले जात आहे. अशातच एक वंदे भारत ट्रेनने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत नवा इतिहास घडवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि दिल्ली दरम्यान जलद सुरक्षित आणि आरामदायी प्रवासात एक नवा अध्याय लिहिणारी जोधपूर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे. जास्त भाडे श्रेणी असूनही, ही ट्रेन लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. जोधपूर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हायस्पीड एक्सप्रेस तिचा वेग, वक्तशीरपणा आणि अत्याधुनिक सुविधांमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. या ट्रेनने राजस्थान आणि दिल्लीमधील कनेक्टिव्हिटीला एका नवीन स्तरावर नेले आहे.
ट्रेनची वाढती मागणी स्पष्ट होते
२७ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत फक्त ४२ फेऱ्यांमध्ये ५९ हजारांहून अधिक प्रवाशांनी या वंदे भारत ट्रेनने प्रवास केला, ज्यामुळे रेल्वेला ६.२१ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला. दिल्लीकडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे तीन हजारांनी जास्त आहे, यावरून ट्रेनची वाढती मागणी स्पष्ट होते, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही ट्रेन मेडता रोड, डेगाना, मकराना, फुलेरा, जयपूर, अलवर, रेवाडी आणि गुडगाव सारख्या प्रमुख स्थानकांवर थांबते आणि अंदाजे ६०४-६२० किमी अंतर फक्त ८ तास ५ मिनिटांत पार करते.
दरम्यान, ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन प्रवाशांना आरामदायी सुविधा, जागा, पूर्णपणे वातानुकूलित डबे, स्वयंचलित दरवाजे, जीपीएस-आधारित माहिती प्रणाली आणि उच्च दर्जाची ऑनबोर्ड सेवा देते. ही ट्रेन भारतीय अभियांत्रिकीची उत्कृष्ट नमुना आहे, जी राजस्थान आणि दिल्ली दरम्यानच्या रेल्वे प्रवासात आधुनिकता, आराम आणि वेगवान जलद प्रवास यांची सांगड घालते, असेही सांगितले गेले.