400 writers made an appeal vote to Narendra Modi | 400 साहिहित्यिकांनी केले नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन
400 साहिहित्यिकांनी केले नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीमुळे सध्या संपूर्ण देशातील वातावरण राजकीय रंगात रंगून गेले आहे. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्येही आता राजकीय वारे वाहू लागले आहे. काही दिवसांपूर्वी लेखक आणि कलाकारांच्या समुहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता देशभरातील ४०० साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

प्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र कोहली, चित्रा मुद्गल, सूर्यकांत बाली अशा प्रसिद्ध साहित्यिकांचा नरेंद्र मोदींना समर्थन देणाऱ्या  ४०० साहित्यिकांमध्ये समावेश आहे. भारतीय साहित्यिक संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या या साहित्यिकांनी देशाची अखंडता, सुरक्षा, स्वाभिमान आणि विकास कायम ठेवण्यासाठी मोदींना मतदान करावे, असे आवाहन केले आहे. 

''भारतीय लोकशाहीमध्ये संविधानाचे महत्त्व सर्वतोपरी आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे मत देशाची अखंडता, सुरक्षा, स्वाभिमान, एकात्मता, सांप्रदायिक, सद्भाव आणि विकास कायम राखण्यासाठी द्यावे, असे आवाहन आम्ही साहित्यिक करत आहोत.'' असे या साहित्यिकांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात देशाची प्रतिष्ठा वाढवणारे, राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध असणारे आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असणारे नेते असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. 

याआधी इंडियन रायटर्स फोरमकडून करण्यात आलेल्या आवाहनामध्ये विविध भाषांमधील २०० हून अधिक लेखकांनी द्वेषाच्या राजकारणाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. या लेखकांमध्ये गिरीश कर्नाड, रोमिला थापर, अमिताब घोष, नयनतारा सैगल आणि अरुंधती रॉय यांचा समावेश होता.  


Web Title: 400 writers made an appeal vote to Narendra Modi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.