हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:40 IST2025-12-04T13:39:07+5:302025-12-04T13:40:09+5:30
रात्री १० च्या सुमारास हायवेच्या सर्व्हिस लेनवर डीसीएम ट्रक उभा होता. सर्व वाहने सामान्य वेगात सुरू होती. परंतु त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने ट्रकला धडक दिली

हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
अमरोहा - राष्ट्रीय महामार्ग ९ वर झालेल्या एका भीषण अपघातात ४ युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे चौघेही वैद्यकीय शिक्षण घेत होते. मेडिकल क्षेत्रात ते इंटर्नशिप करत होते. रात्री उशिरा यूनिवर्सिटीतून परतताना ही घटना घडली.
एका टक्करने स्वप्नं भंगले
रात्री १० च्या सुमारास हायवेच्या सर्व्हिस लेनवर डीसीएम ट्रक उभा होता. सर्व वाहने सामान्य वेगात सुरू होती. परंतु त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने ट्रकला धडक दिली. ही टक्कर इतकी भयंकर होती की आवाजाने आसपासचे लोक घराबाहेर पडले. काही सेकंदात लोक घटनास्थळी धावले परंतु समोरील दृश्य पाहून कुणाचीही पुढे जाण्याची हिंमत झाली नाही. कारचा पुढचा भाग चिरडलेला होता. दरवाजा आतमध्ये घुसला होता. चारही युवक त्यामध्ये फसले होते. कुठलाही आवाज नाही. भयाण शांतता आणि आतील दृश्य कुणाचाही थरकाप उडवेल असं होते.
या घटनेची माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना दिली. थोड्याच वेळात पोलीस तिथे पोहचली. बचाव कार्य सुरू झाले. कटरने कारचे दरवाजे कापण्यात आले. काचा फोडण्यात आल्या आणि आत अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. या चारही युवकांचा जागीच मृत्यू झाला होता. मृतांमध्ये दिल्लीचा आयुष शर्मा, त्रिपुराचा सप्तऋषी दास, अरनब चक्रवर्ती आणि गुजरातच्या श्रेयस पंचोलीचा समावेश आहे. या चौघांनी खासगी विद्यापीठातून २०२० साली एमबीबीएसचं शिक्षण घेतले होते. त्यानंतर इंटर्नशिप करत होते.
दरम्यान, या चौघांच्या मृत्यूची बातमी कुटुंबाला कळताच आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आईच्या डोळ्यासमोर सफेद कोट घातलेला मुलगा दिसत होता तर वडिलांना मुलासोबत केलेला अखेरचा व्हिडिओ कॉल आठवत होता. या चौघांच्या घरी शोककळा पसरली होती. शिक्षण संपवून करिअरची सुरुवात करण्यापूर्वीच चौघांवर काळाचा घाला घातला.