शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात चकमक, ४ दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 06:47 IST2020-10-21T06:46:49+5:302020-10-21T06:47:03+5:30
पुलवामा जिल्ह्यात हरकीपोरा भागात अन्य एका चकमकीत सुरक्षा दलाने तीन अतिरेक्यांना ठार मारले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात चकमक, ४ दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर : जम्मू- काश्मीरच्या शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यांत मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत चार अतिरेक्यांना ठार मारण्यात यश आले आहे. यामुळे दोन चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची संख्या पाच झाली आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षादलांसोबत सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत अतिरेकी मारला गेला. यामुळे या कारवाईत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची संख्या दोन झाली, असे लष्करी अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. झैनपोरा भागातील मेलहुरा येथे अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलांनी सोमवारी सायंकाळी त्या भागाला वेढा घालून त्यांचा शोध सुरू केला.
अतिरेक्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार सुरू करताच चकमक सुरू झाली. एक अतिरेकी सायंकाळीच मारला गेला तर दुसरा मंगळवारी सकाळी, असे अधिकारी म्हणाले. घटनास्थळावरून एके रायफल आणि पिस्टलसह शस्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला. अतिरेक्यांची नावे आणि त्यांचा कोणत्या दहशतवादी गटाशी संबंध आहे याचा शोध घेतला जात आहे.
शस्त्रास्त्रे केली जप्त
पुलवामा जिल्ह्यात हरकीपोरा भागात अन्य एका चकमकीत सुरक्षा दलाने तीन अतिरेक्यांना ठार मारले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. हे अतिरेकी कोण आहेत आणि ते कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत याचा शोध घेतला जात आहे.