अपघातग्रस्त विमानात ४ क्रू मेंबर्स अन् ५ प्रवासी मराठी, केबिन क्रू अपर्णा महाडिक तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 07:24 IST2025-06-13T07:23:33+5:302025-06-13T07:24:07+5:30
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : एअर इंडियाच्या अपघातग्रस्त झालेल्या विमानात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील ९ जणांचा समावेश आहे. यात ४ जण हे क्रू मेंबर असून ५ जण लंडनला निघाले होते.

अपघातग्रस्त विमानात ४ क्रू मेंबर्स अन् ५ प्रवासी मराठी, केबिन क्रू अपर्णा महाडिक तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी
अहमदाबाद - एअर इंडियाच्या अपघातग्रस्त झालेल्या विमानात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील ९ जणांचा समावेश आहे. यात ४ जण हे क्रू मेंबर असून ५ जण लंडनला निघाले होते.
अपघातग्रस्त विमानातील १२ क्रू मेंबर्सपैकी चार क्रू मेंबर हे मराठी आहेत. त्यातील अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचा सख्खा भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. त्या एअर इंडियात सीनियर केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अमोल हेही एअर इंडियात पायलट म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय, मैथिली पाटील, दीपक पाठक व रोशनी सोनघरे हे क्रू मेंबरही मराठी आहेत. मैथिली पाटील ही पनवेल (जि. रायगड) येथील असून ती एअर होस्टेस होती. तर डोंबिवलीतील (जि. ठाणे) येथील रोशनी सोनघरे ही क्रू मेंबर होती. तसेच, दीपक पाठक (रा. बदलापूर, जि.ठाणे) हेही केबिन क्रू मेंबर म्हणून विमानात कर्तव्यावर होते.
तसेच, महादेव पवार आणि आशाबेन पवार हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील दाम्पत्य लंडनमध्ये राहणाऱ्या मुलाकडे निघाले होते. याशिवाय, नागपूरमधील मनीष नेमचंद कामदार यांची मुलगी यशा कामदार-मोढा, तिचा छोटा मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मोढा हेही लंडनला निघाले होते. परंतु, या दुर्घटनेत त्यांच्यावर काळाने घाला घातला.
ही एक हृदयद्रावक आपत्ती आहे. मी त्यांच्या दु:खात सहभागी असून, मी अपघातग्रस्त लोकांसाठी शोक व्यक्त करते. अतीव दुःखाच्या या क्षणी राष्ट्र त्यांच्यासोबत उभे आहे.
- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
अहमदाबादमधील दुर्घटनेने धक्का बसला आहे. हे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मी सर्व बाधित लोकांबाबत शोक व्यक्त करतो. बाधित लोकांना मदत करण्यासाठी कार्यरत मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात मी आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
विमान योग्यरीत्या तपासले गेले नव्हते का?
विमान सुरक्षा सल्लागार जॉन एम. कॉक्स यांनी सांगितले की, पहिला प्रश्न असा पडतो तो म्हणजे विमान उड्डाणासाठी सुसज्ज होते का? छायाचित्रे पाहता विमानाचे स्लॅट्स आणि फ्लॅप्स योग्य स्थितीत नव्हते, असे वाटते. विमानाचे नाक वर जाताना आणि नंतर खाली झुकताना दिसते. याचा अर्थ विमानाला पुरेशी उंची घेता आली नाही, असे दिसते.
अशा जेट विमानांमध्ये बॅकअप यंत्रणा असतात, जसे की एका इंजिनवरही विमान वर जाऊ शकते. त्यामुळे हा अपघात अजूनच आश्चर्यकारक वाटतो, असे कॉक्स यांनी म्हटले आहे.