"३९ लाख मतदार सगळीकडे फिरणार; महाराष्ट्र पॅटर्न आता दिल्ली, बिहारमध्ये राबवणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:15 IST2025-02-07T14:14:32+5:302025-02-07T14:15:31+5:30
३९ लाख मतदार बिहारला जाणार, त्यानंतर उत्तर प्रदेशात जाणार. हा एक नवीन पॅटर्न बनला आहे असं राऊतांनी सांगितले.

"३९ लाख मतदार सगळीकडे फिरणार; महाराष्ट्र पॅटर्न आता दिल्ली, बिहारमध्ये राबवणार"
नवी दिल्ली - निवडणूक आयोग सरकारची गुलामी करतंय. आम्ही वारंवार राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आमचं डोकं फोडलं. ३९ लाख मतदार कुठून आले आणि कुठे जाणार, आता हे ३९ लाख मतदार बिहारला जाणार. नावे तीच राहणार, आधार कार्ड तीच राहणार, फक्त ते मतदार फिरत राहणार. काही दिल्लीत आले, काही बिहारला जातील. महाराष्ट्र पॅटर्न दिल्ली, बिहार मग उत्तर प्रदेशातही राबवणार अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दिल्लीत राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, ३९ लाख मतदार बिहारला जाणार, त्यानंतर उत्तर प्रदेशात जाणार. हा एक नवीन पॅटर्न बनला आहे. याच पॅटर्नने निवडणूक लढवली जाते आणि जिंकली जाते. राहुल गांधींच्या नेतृत्वात आम्ही प्रश्न उभे केलेत. देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर या प्रश्नांची उत्तरे माध्यमांनी विचारली पाहिजे. लोकांमध्ये जागरुकता आली पाहिजे. आम्ही लढत राहू. आम्हाला महाराष्ट्रात हरवलं गेले, हा मुद्दा देशासमोर राहुल गांधींनी आणला. लोकांनी उठाव करून या प्रश्नांची उत्तरे विचारली पाहिजे असं त्यांनी सांगितले.
आमची मते कमी नाही, भाजपाची मते वाढली - काँग्रेस
तर महाराष्ट्राच्या निवडणुकीत मतदार याद्यांवर प्रश्न उभे राहतात. दरवर्षी जितके मतदार यादीत नोंदवले जातात त्याहून अधिक फक्त ५ महिन्यात नोंदणी केली. अतिरिक्त मतदार वाढवले हे कोण आहे, ते कुठून आले. महाराष्ट्राची वयस्क लोकसंख्या सरकारच्या आकडेवारीनुसार ९.५४ कोटी आहे. महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे वाढले, कामठी विधानसभेत १.६३ लाख मते लोकसभेला काँग्रेसला मिळाली, विधानसभेलाही तितकेच मतदान झाले. मात्र या मतदारसंघात ३५ हजार मते वाढली आणि ती सगळी भाजपाच्या खात्यात गेली आणि भाजपा निवडणूक जिंकली. अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात आमची मते कमी झाली नाहीत, भाजपाची मते वाढली आहेत. जिथं भाजपाचा स्ट्राईक रेट ९० टक्क्याहून अधिक आहे तिथे मतदार वाढले आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला.
LIVE: Joint Press Conference | Constitution Club Of India, New Delhi https://t.co/kpb1Pa1Uqh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 7, 2025
दरम्यान, बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, मशीन बंद करावे. आमचा पक्ष फोडले, आमदार, खासदार फोडले, आमची लढाई आजही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आम्हाला जे चिन्ह दिले, त्यातही साधर्म्य असलेले दिले. लोकसभेला सातारा मतदारसंघात आमचा विजय झाला असता परंतु तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यात मतांमध्ये तफावत झाली. मतदार याद्यांचा गोंधळ आहे. सशक्त लोकशाही ठेवायची असेल पारदर्शक निवडणूक घ्यायला हवी. निवडणूक आयोग पारदर्शी असायला हवा. आम्हाला मतदार यादी, मतदारांचे फोटो, नावे द्यावीत ही आमची मागणी आहे.