९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 00:17 IST2025-09-27T23:16:50+5:302025-09-28T00:17:19+5:30
तमिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ३६ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत.

९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
Tamil Nadu Karur Stampede: तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ३६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १६ महिला आणि ८ मुलांचा समावेश आहेत, असे तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम.ए. सुब्रमण्यम यांनी सांगितले. या अपघातात ५८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. परिस्थिती पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आता या चेंगराचेंगरीची अनेक कारणे समोर येत आहेत.
टीव्हीके प्रमुख विजय यांनी शनिवारी करूर येथे एक रॅली आयोजित केली होती. विजय दुपारी १२ वाजता पोहोचणार होते, परंतु त्यांना किमान सहा तास उशीर झाला. गर्दी हळूहळू वाढत गेली आणि विजय रॅलीला संबोधित करत असताना गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याने उष्णता वाढली. पक्षाचे कार्यकर्ते आणि मुले, इतरांसह, बेशुद्ध पडू लागले. अनेक लोकांनी विजयला खाली काय होतंय याची माहिती दिली. त्यानंतर विजयने भाषण थांबवले आणि त्याच्या प्रचाराच्या बसमधून लोकांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या. प्रचंड गर्दीमुळे रुग्णवाहिका देखील रुग्णालयात पोहोचण्यास अडचणी आल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
अभिनेता-राजकारणी विजय यांच्या पक्षाच्या तमिलगा वेट्टी कझगमच्या रॅलीसाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. विजयचे भाषण सुरु असतानाच ९ वर्षांची एक मुलगी बेपत्ता झाल्याचे कळले. विजयपर्यंत ही माहिती पोहचवण्यात आली. त्यानंतर विजयने प्रचाराच्या बसवरून पोलीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मुलीला शोधण्याचे आवाहन केले, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. गर्दीत अडकल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अनेक लोक आणि कार्यकर्ते बेशुद्ध पडू लागले. परिस्थिती बिघडत चालली आहे हे पाहून विजयने आपले भाषण थांबवले आणि जमावाला शांततेचे आवाहन केले. त्यानंतर तो निघून गेला.
विजयच्या रॅलीमध्ये १०,००० लोकांची परवानगी होती. प्रशासनाला ५०,००० लोक येण्याची अपेक्षा होती, पण तिथे अंदाजे १,२०,००० लोक जमले होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत दिली जाईल. करूर अपघातानंतर, अभिनेता विजयला त्रिची विमानतळावर पाहिले गेला, जिथून तो विमानाने परत जात होता.