बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक, ३३ जणांना अटक; बेळगाव पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:57 IST2025-11-14T15:56:57+5:302025-11-14T15:57:31+5:30
३७ लॅपटॉप, ३७ मोबाइल फोन, तसेच तीन वाय-फाय राऊटर, असा एकूण सुमारे ८ लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक, ३३ जणांना अटक; बेळगाव पोलिसांची कारवाई
बेळगाव : बेळगाव शहरात बनावट कॉल सेंटर चालवून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बेळगाव सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत विविध राज्यांमधील एकूण ३३ आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून ३७ लॅपटॉप, ३७ मोबाइल फोन, तसेच तीन वाय-फाय राऊटर, असा एकूण सुमारे ८ लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. मुख्य सूत्रधार गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये आहेत.
सुरक्षा विभागाच्या माहितीवरून आणि निनावी पत्राच्या आधारावर सायबर गुन्हे पोलिस ठाण्याचे एएसआय एल. एस. चिनगुंडी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी बेळगावातील आझमनगर सर्कलजवळील कुमार हॉलवर छापा मारून अनधिकृत कॉल सेंटर चालवणाऱ्या ३३ आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींमध्ये गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मेघालय, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड आणि नागालँड अशा विविध राज्यांतील व्यक्तींचा समावेश आहे.
या आरोपींनी अमेरिकेतील नागरिकांना एसएमएसद्वारे ‘तुमचा ॲमेझॉन ऑर्डर प्लेस झाला आहे’ असा संदेश पाठविला होता. त्यात काही त्रुटी असल्यास खाली दिलेल्या कस्टमर सर्व्हिस नंबरवर कॉल करा, असा संदेश पाठवून फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.