३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:30 IST2025-11-27T18:27:52+5:302025-11-27T18:30:28+5:30
Vande Bharat Express Train News: देशभरात २० कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनच्या यादीत आणखी एका वंदे भारत ट्रेनचा समावेश होणार आहे.

३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
Vande Bharat Express Train News: देशभरात आताच्या घडीला सुमारे १६० वंदे भारत एक्स्प्रेसच्या सेवा सुरू आहेत. प्रवाशांचा वंदे भारत ट्रेनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतीय रेल्वेची आताच्या घडीला सर्वांत लोकप्रिय ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस आहे. प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आणि वाढती मागणी पाहता देशातील अनेक वंदे भारत ट्रेनचे कोच वाढवण्यात आले आहेत. आणखीही काही वंदे भारत ट्रेनचे कोच वाढवले जाणार आहेत. यातच एका वंदे भारत ट्रेनला कायमस्वरुपी चार कोच वाढवण्यात आले आहेत.
प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हुरूपलेल्या मध्य रेल्वे प्रशासानाने नागपूर-इंदोर वंदे भारत एक्सप्रेसची प्रवासी आसन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता या ट्रेनला आणखी आठ कोच जोडले जाणार आहे. गाडी क्रमांक २०९१२/२०९११ नागपूर-इंदोर-नागपूर एक्सप्रेसला भरभरून प्रवासी मिळत असल्याने या गाडीमध्ये अनेकदा आसने उपलब्ध नसतात. सध्या या गाडीला आठ कोच आहेत. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना वेटिंगवर राहावे लागते. ही स्थिती लक्षात आल्याने या गाडीला आणखी कोच जोडून आसन क्षमता वाढविण्यावर अनेक दिवसांपासून विचार सुरू होता. तसा प्रस्तावही रेल्वे बोर्डाकडे गेला होता. त्याला अखेर मंजूरी मिळाली. यासह तिरुपती वंदे भारत ट्रेनला कायमस्वरुपी चार कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तिरुपती वंदे भारत ट्रेनच्या कोचची संख्या २० होणार आहे.
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार
वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत मार्गावर शेकडो जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक २०७०१ सिकंदराबाद ते तिरुपती आणि ट्रेन क्रमांक २०७०२ तिरुपती ते सिकंदराबाद या वंदे भारत ट्रेनला चार अतिरिक्त वातानुकूलित चेअर कार कोच जोडले जाणार आहेत. यामुळे या वंदे भारत ट्रेनमध्ये आता ३०० सीट वाढतील आणि कोचची संख्या १६ वरून २० होणार आहे.
दरम्यान, ही वंदे भारत ट्रेन सध्या आठवड्यातून सहा दिवस धावते. मंगळवारी या वंदे भारत ट्रेनची सेवा नसते. सिकंदराबादहून ही ट्रेन सकाळी ६ वाजता सुटते. तर परतीच्या प्रवासासाठी ही ट्रेन तिरुपतीहून दुपारी सव्वा तीन वाजता निघते आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी सिकंदराबादला पोहोचते.