मध्य प्रदेशात काँग्रेससाठी या 30 जागा ठरणार निर्णायक, भाजपाच्या अडचणी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 17:52 IST2018-11-14T15:33:59+5:302018-11-14T17:52:57+5:30
मध्य प्रदेश विधानसभेची निवडणुकीमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून प्रत्येक मतदारसंघातील समीरकणांची आकडेमोड सुरू आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेससाठी या 30 जागा ठरणार निर्णायक, भाजपाच्या अडचणी वाढणार
भोपाळ - यावेळी मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून प्रत्येक मतदारसंघातील समीकरणांची आकडेमोड करून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत झालेल्या आणि 2500 हून कमी मतांनी जय पराजयाचा निर्णय झालेल्या 30 जागांवर दोन्ही पक्षांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या 30 जागांवर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा अगदी काठावरच्या मताधिक्याने विजय झाला होता. दरम्यान, यावेळी काँग्रेसने भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशमधील गेल्या दोन निवडणुकांमधील निकाल पाहिल्यास काँग्रेसला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढली आहे. मात्र त्यांच्या जागांमध्ये घट झाली आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या जागा आणि मते दोन्हींमध्ये वाढ झालेली दिसत आहे. 2008 साली काँग्रेसने मध्य प्रदेशात 71 जागा जिंकल्या होत्या. मात्र 2013 मध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढूनही काँग्रेसच्या जागा घटल्या होत्या.
ज्या 30 मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या 30 उमेदवारांना 2 हजार 500 हून कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता, अशा मतदारसंघात विजयश्री खेचून आणण्यासाठी काँग्रेसने तिकीट वाटप करताना विशेष लक्ष दिले होते. तसेच येथील जातीय समीकरणेही विचारात घेण्यात आली आहेत.
या 30 जागांपैकी 11 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा केवळ 1 हजारहून कमी मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे अशा जागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. दुसरीकडे गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने आपल्या मतांच्या टक्केवारीबरोबरच जागांची संख्याही वाढवली आहे. 2008 साली भाजपाला 143 जागा मिळाल्या होत्या. तर 2013 साली भाजपाने 165 जागांपर्यंत मुसंडी मारली होती. विशेष बाब म्हणजे सहा मतदारसंघांमध्ये भाजपाच्या उमेदवारांचा 1 हजारहून कमी मतांनी पराभव झाला होता. सध्या भाजपा नेत्यांनी पाच हजारहून कमी मताधिक्याने पराभव झालेल्या जागांवर लक्ष केंद्रित केले आहेत.