महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 06:43 IST2026-04-11T06:42:39+5:302026-04-11T06:43:09+5:30
ही ‘सोनार बांग्ला’ची रूपरेषाच- अमित शाह

महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
कोलकाता: भारतीय जनता पक्षाने (भाजप) शुक्रवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आपले संकल्पपत्र जाहीर केले. त्यानुसार सत्तेत आल्यास घुसखोरीविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे तसेच प्रत्येक महिला आणि बेरोजगार युवकाला मासिक ३ हजार रुपये भत्ता देण्याचे आश्वासन यात देण्यात आले आहे. याशिवाय, सत्तेत आल्यानंतर ४५ दिवसांच्या आत राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे अभिवचन यात देण्यात आले आहे.
‘सोनार बांग्ला’ची रुपरेषा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे संकल्पपत्र जाहीर करताना ‘सोनार बांग्ला’च्या निर्मितीची ही रूपरेषा असल्याचे नमूद केले. तृणमूल काँग्रेसचे राज्यातील १५ वर्षांचे शासन पश्चिम बंगालसाठी एक वाईट स्वप्न होते, असे ते म्हणाले. भाजपचे हे संकल्पपत्र शेतकरी, तरुण आणि महिलांना नवीन दिशा देईल. पश्चिम बंगालच्या संस्कृतीवर अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक नागरिकाला नवीन आशा देईल, अशी हमी शाह यांनी दिली.
डिटेक्टर, डिलीट अन् डिपोर्ट
घुसखोरी आणि सीमा सुरक्षेच्या मुद्द्यावर भर देताना त्यांनी सांगितले की, राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर घुसखोरांविरुद्ध डिटेक्ट (ओळखणे), डिलीट (कारवाई करणे) आणि डिपोर्ट (हद्दपार करणे) ही नीती अवलंबेल. पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी कधीही सहन केली जाणार नाही. समान नागरी कायदाही पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू केला जाईल. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे स्वतंत्रपणे पालन करण्याची हमी देण्यासाठी हा कायदा आणला जाईल, असे अमित शाह यांनी नमूद केले.
संकल्पपत्रात ही आश्वासने
- सीमांना सुरक्षित करण्याचे आणि जनावरांच्या तस्करीवर बंदी.
- शेतकरी सन्मान योजनेत केंद्राचे ६ हजार व राज्याचे ३ हजार असे ९ हजार रुपये देण्याची हमी.
- पोलिस व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण.
- स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये अतिरिक्त रक्कम देणार
- राजकीय हिंसाचाराच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमणार
- उ. बंगालमध्ये एम्स, आयआयटी, फॅशन डिझाइन संस्थांची स्थापना
एक वेळ सापावर विश्वास ठेवता येईल, परंतु भाजपवर कधीही नाही : ममता
तेंतुलिया (पश्चिम बंगाल) : भारतीय जनता पक्षाने (भाजप) आसामच्या रहिवाशांच्या मतांच्या आधारावर विजयाचा विश्वास नसल्याने या राज्यात प्रचार आणि नियोजनासाठी मतदान होईपर्यंत बाहेर राज्यातील लोक आणले असल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील तेंतुलिया येथे एका जाहीर सभेत बोलताना ममता यांनी आरोप केला की, केंद्रातील भाजप सरकारच्या काळात देशातील कोणतीही यंत्रणा तटस्थ नाही. या पक्षाने एकप्रकारे सर्वांना विकत घेतले आहे. ममता यांनी म्हटले आहे की, एक वेळ सापावर विश्वास ठेवता येईल, परंतु भाजपवर नाही. सध्या दोन्ही बाजुंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
लोक, पैसा आणि ड्रग्ज बाहेरून आणले जात आहेत. या स्थितीत आमचे (तृणमूलचे) कार्यकर्ते लढतील आणि जिंकतीलही. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेदरम्यान पश्चिम बंगालमधील ९० लाख नावे वगळण्यात आली आहेत. यामुळे आयोगावर लोक टीका करत आहेत. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, वगळण्यात आलेल्या ९० लाख नावांपैकी ६० लाख हिंदू आणि ३० लाख अल्पसंख्याक आहेत.
बंगालमध्येही तोच डाव
पश्चिम बंगालबाहेरील लोकांना आणण्यासाठी आसामसारखेच डावपेच भाजप आखत असल्याचा दावा करून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याचे ममता यांनी नमूद केले. आयोगाने अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या होत्या.