मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:17 IST2025-10-08T19:17:04+5:302025-10-08T19:17:58+5:30
Narendra Modi News: २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी घडलेल्या घडामोडींवरून मोदींनी काँग्रेसला निशाणा साधला. तसेच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून काँग्रेसने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले, असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला.

मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुंबई आणि देशभरात सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला. त्याबरोबरच २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी घडलेल्या घडामोडींवरून मोदींनी काँग्रेसला निशाणा साधला. तसेच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून काँग्रेसने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले, असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पडद्यामागे घडलेल्या घडामोडींबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी हल्लीच एका मुलाखतीमधून मोठा गौप्यस्फोट केला होता. त्याचाच आधार घेत नरेंद्र मोदी म्हणाले की, २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यावेळी संपूर्ण देश या हल्ल्याच्या वेदना सहन करत होता, तेव्हा काँग्रेसने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले होते. हल्लीच काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, जेव्हा मुंबईवर हल्ला झाला होता तेव्हा आपलं लष्कर पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी सज्ज झालं होतं. संपूर्ण देशाचीही तीच इच्छा होती. मात्र कुठल्यातरी अन्य देशाच्या दबावाखाली येऊन काँग्रेस सरकारने देशाच्या सैन्यदलांना पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून रोखले. तो कोण होता ज्याने परकीय दबावाखाली येऊन हा निर्णय घेतला. तसेच मुंबई आणि देशवासियांच्या भावनांशी खेळ केला, हे काँग्रेसला सांगावे लागेल. अशी कोणत्या परकीय शक्तीच्या सांगण्यावरून हल्ला रोखला गेला याचं उत्तर काँग्रेसने दिलं पाहिजे, असे नरेंद्र मोदगी म्हणाले.
याबाबत पी. चिदंबरम यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसवर टीकास्र सोडताना नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेली कबुली ही तत्कालीन यूपीए सरकारच्या कार्यकाळात राजकारण हे देशहितापेक्षा अधिक महत्त्वाचं मानलं जात होतं, हे सिद्ध करते. जर त्यावेळी देशात सक्षम आणि निर्णायक नेतृत्व असतं तर दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं गेलं असतं. आजचा भारत हा गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. आजचा भारत घरात घुसून मारतो. ऑपरेशन सिंदूर वेळी संपूर्ण जगाने भारताची ताकद पाहिली आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.