2611 mumbai attack posters against pakistan pasted in different areas of jammu and kashmir | 26/11 Terror Attack: 'आम्ही हे कधीच विसरणार नाही', जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध

26/11 Terror Attack: 'आम्ही हे कधीच विसरणार नाही', जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध

श्रीनगर - मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. पाकिस्तानमधून समुद्रामार्गे आलेल्या दहशतवाद्यांच्या पथकाने मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास 168 लोकांचा मृत्यू झाला. मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात एकूण 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. याच दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तानविरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. 

आम्ही हे कधीच विसरणार नाही असं म्हणत जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध करण्यात आला आहे. गुपकर, राजबाग, टीआरसी, बारामालू आणि हैदरपुरा या भागात हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याचा उल्लेख करत आम्ही पाकिस्तानी लोकांनी जे केले ते कधीच विसरणार नाही असं म्हटलं आहे. तसेच हल्ल्याबाबत पोस्टरवर, "या दहशतवाद्यांनी कोणतीही दया दाखवली नाही, यांनी आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान आणि त्याच्या पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर रोजी दहशत निर्माण केली. दहशतवादाविरोधात देश एकत्र आहे" असं म्हटलं आहे.

26/11 च्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे परिसरासह समुद्रकिनारी गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच मुंबईच्या गर्दीच्या ठिकाणी पोलीस तैनात आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी मुंबई पोलीस दल अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज केले जात आहे. हल्ल्यादरम्यान कोलमडलेला नियंत्रण कक्षही अद्ययावत बनला असून, चांगली कामगिरी बजावताना दिसत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत मुंबई पोलीसही नवनवीन तंत्रज्ञानाशी जोडले गेले. अद्ययावत वेबसाईट, अत्याधुनिक नियंत्रण कक्ष तसेच पोलीस अधिकाऱ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली.

कसाबसह खात्मा झालेल्या 10 दहशतवाद्यांसाठी पाकमध्ये प्रार्थना करतोय हाफिज सईद

पाकिस्तानात राजकारणाचा बुरखा परिधान केलेल्या जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेने मुंबई हल्ल्यात मारले गेलेल्या 10 दहशतवाद्यांसाठी आज प्रार्थना सभेचं आयोजन केलं आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार जमात-उद-दवाचे प्राबल्य असलेल्या मशिदींमध्ये संघटनेची बैठक झाली असून 2008 च्या मुंबई हल्ल्यात तब्बल 168 जणांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या दहशतवाद्यांसाठी प्रार्थना करण्याचं निश्चित केलं गेलं आहे. हाफिज सईदने आज थेट मारले गेलेल्या दहशतवाद्यांसाठी प्रार्थना सभेचं आयोजन केल्यानं देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 2611 mumbai attack posters against pakistan pasted in different areas of jammu and kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.