बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव! सफाई कर्मचाऱ्याच्या एका पदासाठी 250 अर्ज; उच्चशिक्षितांची रांग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 15:50 IST2024-02-29T15:43:48+5:302024-02-29T15:50:19+5:30
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उच्चशिक्षित तरुण धडपडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - hindi.news18
तरुणांना स्टार्टअपसारख्या क्षेत्रात जाण्यासाठी सरकार सातत्याने मदत करत आहे. एवढे सगळे करूनही सरकारी नोकऱ्या मिळण्यासाठी तरुणांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत नोकरी आणि पगाराच्या तुलनेत पदवीचा कोणताही विचार केला जात नाही. त्यामुळेच सफाई कामगाराच्या एका पदासाठी 250 तरुणांनी अर्ज केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये काही पदव्युत्तर लोकांचाही समावेश आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत बेरोजगारीवर निबंध लिहित आहेत. प्रत्येक निवडणुकीत बेरोजगारी हटवून रोजगार उपलब्ध करून देणे हा राजकीय पक्षांसाठी सर्वात मोठा मुद्दा असतो. मात्र तरी देखील बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव पाहायला मिळत आहे. याच दरम्यान तरुणांमध्ये देखील सरकारी नोकऱ्यांची क्रेझ वाढत आहे.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उच्चशिक्षित तरुण धडपडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्याच्या पदासाठी एक जागा आहे. मात्र यासाठी अर्जदारांची भलीमोठी रांग पाहायला मिळाली.
सफाई कर्मचारी पदासाठी पदासाठी बारावी उत्तीर्ण अशी पात्रता सांगण्यात आली होती. पण कोरबा जिल्ह्यातील उच्चशिक्षित तरूणही नोकरी मिळविण्यासाठी अर्ज करत आहेत. पी.बी. सिदार म्हणाले की, सफाई कामगाराच्या भरती प्रक्रियेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीसह पुढील कार्यवाही करण्यात येत असून, त्यात उच्चशिक्षित उमेदवारांचाही समावेश आहे. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.