UAE मध्ये 25 अन् सौदीत 11 भारतीयांना फाशीची शिक्षा; सरकारने संसदेत आकडेवारी मांडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 22:02 IST2025-03-20T22:02:47+5:302025-03-20T22:02:56+5:30
सध्या परदेशी तुरुंगात कैद असलेल्या भारतीय कैद्यांची संख्या 10,152 आहे.

UAE मध्ये 25 अन् सौदीत 11 भारतीयांना फाशीची शिक्षा; सरकारने संसदेत आकडेवारी मांडली
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच शहजादी खान नावाच्या भारतीय महिलेला युएईमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या घटनेची भारतात खूप चर्चा झाली, तसेच सरकारविरोधात तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली. आता सरकारने गुरुवारी संसदेत UAE सह विविध देशांमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नागरिकांची यादी जाहीर केली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
अनेक भारतीय वर्षानुवर्षे परदेशी तुरुंगात कैद आहेत. परदेशात मृत्युदंडाची शिक्षा मिळालेल्या भारतीयांचा तपशील आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी भारत सरकारने काय प्रयत्न केले? असा प्रश्न परराष्ट्र मंत्रालयाला विचारण्यात आला.
परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी दिली माहिती
या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले, मंत्रालयाकडे उपलब्ध माहितीनुसार सध्या परदेशी तुरुंगात कैद असलेल्या भारतीय कैद्यांची संख्या 10,152 आहे. यावेळी मंत्र्यांनी 8 देशांशी संबंधित डेटा शेअर केला आणि फाशीची शिक्षा झालेल्या भारतीय नागरिकांची संख्याही सांगितली, परंतु अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
UAE मध्ये 25 भारतीयांना मृत्यूदंडाची शिक्षा
मिळालेल्या माहितीनुसार, UAE मध्ये 25 भारतीयांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय, सौदी अरेबियामध्ये 11, मलेशिया 6, कुवेत 3 आणि इंडोनेशिया, कतार, अमेरिका आणि येमेनमध्ये प्रत्येकी एका भारतीयाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परदेशातील भारतीय मिशन/पोस्ट परदेशातील न्यायालयांद्वारे मृत्युदंडासह विविध शिक्षा झालेल्या भारतीय सरकारी वकील पुरवणे, संबंधित एजन्सींकडे त्यांच्या खटल्यांचा पाठपुरावा करणे, अपील, दया याचिका इत्यादींसह विविध कायदेशीर उपाय शोधण्यात मदत केली जाते.
किती भारतीयांना फाशी झाली?
कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की, मलेशिया, कुवेत, कतार आणि सौदी अरेबियामध्ये अशा प्रकारच्या शिक्षा देण्यात आल्या आहेत. 2024 मध्ये कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये प्रत्येकी तीन भारतीय नागरिकांना फाशी देण्यात आली आहे. 2023 मध्ये कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये प्रत्येकी पाच भारतीयांना मृत्युदंडाची शिक्षा दिली, तर मलेशियामध्ये एका भारतीयाला फाशीची शिक्षा देण्यात आली होती.