नवी दिल्ली : बँका, विमा, पोस्ट कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम यांसारख्या विविध क्षेत्रांतील सुमारे २५ कोटी कर्मचारी व कामगार बुधवारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. त्यामुळे देशभरातील विविध सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
दहा केंद्रीय कामगार संघटना व त्यांच्या सहयोगी संस्थांनी हा संप पुकारला आहे. ‘सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरी विरोधी व कारखानदार समर्थक धोरणांना विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली आहे’, असे या संघटनांनी म्हटले आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजीत कौर यांनी सांगितले की, देशभरातील २५ कोटी कर्मचारी बंदमध्ये सहभागी होतील. शेतकरी आणि ग्रामीण कर्मचारी धरणे आंदोलनात भाग घेतील.