खळबळजनक! शाळेतील २५ मुलांच्या हातावर ब्लेडच्या जखमा, कारण ऐकून हादरुन जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:25 IST2025-03-26T13:24:58+5:302025-03-26T13:25:39+5:30
इयत्ता पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीच्या २५ हून अधिक मुलांच्या हातावर ब्लेडने केलेल्या जखमांच्या खुणा आढळून आल्या, त्यानंतर शाळा आणि गावात खळबळ उडाली.

फोटो - आजतक
गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील मुंजियासर प्राथमिक शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीच्या २५ हून अधिक मुलांच्या हातावर ब्लेडने केलेल्या जखमांच्या खुणा आढळून आल्या, त्यानंतर शाळा आणि गावात खळबळ उडाली. पालकांनी शाळा प्रशासनाकडे याचं उत्तर मागितलं, परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली आणि पोलिसांची मदत मागितली.
प्रकरणाचं गांभीर्य पाहून धारीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी) जयवीर गढवी शाळेत पोहोचले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि मुलांशी बोलून घटनेचा उलगडा केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना ऑनलाइन व्हिडिओ गेमच्या व्यसनामुळे घडलेली नाही, तर Truth and Dare गेम दरम्यान घडली.
एएसपी गढवी म्हणाले की, एका खेळादरम्यान, इयत्ता ७ वी च्या एका विद्यार्थ्याने इतर मुलांना चॅलेंज दिलं की जो कोणी ब्लेड हातावर मारेल त्याला १० रुपये मिळतील आणि जो कोणी असे करणार नाही त्याला ५ रुपये द्यावे लागतील. या चॅलेंजमुळे २५ हून अधिक मुलांनी पेन्सिल शार्पनरच्या ब्लेडने त्यांच्या हातावर कट केले. याबाबतची माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना (डीपीईओ) देण्यात आली आहे.
तपासात असं दिसून आलं की, जेव्हा शाळा प्रशासनाला या घटनेची माहिती मिळाली तेव्हा मुलांना घरी काहीही न सांगण्याची सूचना देण्यात आली. त्यांना सांगण्यात आलं की जर कोणी त्यांना हाताच्या खुणांबद्दल विचारलं तर खेळताना पडल्यानंतर दुखापत झाल्याचं सांगावं. जेव्हा एका पालकाला सत्य कळलं, तेव्हा शाळेत चौकशी करण्यात आली, त्यानंतर प्रशासनाने पालकांसोबत बैठक घेतली. हे प्रकरण गावातील सरपंच आणि इतर लोकांपर्यंत पोहोचलं, त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं.
पोलिसांनी स्पष्ट केलं की हे प्रकरण 'ट्रुथ अँड डेअर' गेमशी संबंधित आहे आणि कोणत्याही ऑनलाइन गेमच्या व्यसनाशी संबंधित नाही. खेळादरम्यान, मुलांनी शार्पनरच्या ब्लेडने एकमेकांच्या हातावर खुणा केल्या. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पालक आणि ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून पोलीस आणि शिक्षण विभाग आता या घटनेचा सखोल तपास करत आहेत.