पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 05:20 IST2025-11-25T05:19:17+5:302025-11-25T05:20:29+5:30
: नवरा आणि सासरच्या जाचामुळे खचलेल्या २४ हजार ४८ महिलांनी आत्महत्या केली असल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. २०२३ मध्ये एकूण ४६,६४८ महिलांनी आत्महत्या केल्या होत्या. यातील जवळपास ५० टक्के महिलांनी नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या, हे येथे उल्लेखनीय.

पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
- चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली - नवरा आणि सासरच्या जाचामुळे खचलेल्या २४ हजार ४८ महिलांनी आत्महत्या केली असल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. २०२३ मध्ये एकूण ४६,६४८ महिलांनी आत्महत्या केल्या होत्या. यातील जवळपास ५० टक्के महिलांनी नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या, हे येथे उल्लेखनीय.
महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्यामुळे नवरा आणि सासरच्यांकडून सुनांचा जो छळ होतो तो मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी, पुण्याच्या वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. हगवणे यांना मृत्यूपूर्वी क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती, असे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले होते.
राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरो अहवालातील माहिती
राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा श्वास घरातच गुदमरायला लागला आहे.
नवरा आणि सासरच्या असह्य त्रासामुळे २०२३ मध्ये महाराष्ट्रातील २,३७३ सुनांनी जगण्यापेक्षा आत्महत्या करून जीवन संपविण्याचा मार्ग निवडला आहे.
महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी ही माहिती राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२३च्या अहवालातून पुढे आली आहे.