कर्नाटकात २२ जण हृदयविकाराच्या झटक्याने दगावले; मृत्यूमागे कोविड लसीचा संबंध असल्याचा सिद्धरामय्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 20:59 IST2025-07-01T20:42:42+5:302025-07-01T20:59:06+5:30
नागरिकांमध्ये घबराट; हृदयरोगाच्या तपासणीसाठी रुग्णालयात गर्दी

कर्नाटकात २२ जण हृदयविकाराच्या झटक्याने दगावले; मृत्यूमागे कोविड लसीचा संबंध असल्याचा सिद्धरामय्यांचा दावा
कर्नाटकातील हसन जिल्ह्यात हृदयविकाराच्या झटक्यानंतर अचानक झालेल्या मृत्यूंमुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ४० दिवसांत एकट्या हसन जिल्ह्यात २२ जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ३० जून रोजीच तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतेक तरुण आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेचा संबंध कोविड लसीकरणासोबत जोडला आहे.
कर्नाटकात तरुणांमध्ये अचानक हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यूच्या घटना वाढल्याने सरकारला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तज्ञांच्या समितीला त्यांचे निष्कर्ष सादर करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. गेल्या महिन्यात, हसन जिल्ह्यात किमान २० लोक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले होते. त्यापैकी अनेकांना पूर्वी कोणतीही लक्षणे किंवा आजार नव्हते. हसन जिल्ह्याच्या उपायुक्त के.एस. लताकुमारी म्हणाल्या की, "असंसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञांची एक टीम या प्रकरणाची चौकशी करेल आणि लवकरच अहवाल सादर करेल. या अहवालात हृदयविकाराच्या कारणांचा अभ्यास केला जाईल."
दुसरीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत एक्स पोस्ट करुन मोठे विधान केले आहे. त्यांनी ही अतिशय गंभीर बाब असल्याचे म्हटलं. "हसनमध्ये होत असलेल्या मृत्यूबद्दल आम्हाला चिंता आहे. गेल्या एका महिन्यात फक्त एकाच जिल्ह्यात हसनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही एक अतिशय गंभीर बाब आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे आणि कारण शोधण्यासाठी डॉ. रवींद्रनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. समितीला १० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
"फेब्रुवारीमध्येच, या समितीला राज्यातील तरुणांच्या अचानक मृत्यूंमागील कारणांची सविस्तर चौकशी करण्याची आणि कोविड लसीचे काही दुष्परिणाम आहेत का हे तपासण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता या दिशेने रुग्णांची तपासणी केली जात आहे आणि माहितीचे विश्लेषण देखील केले जात आहे," असेही सिद्धरामय्या यांनी म्हटलं.
दरम्यान, हसनमध्ये आतापर्यंत झालेल्या २२ मृत्यूंपैकी ५ जण १९ ते २५ वर्षे वयोगटातील होते आणि ८ जण २५ ते ४५ वर्षे वयोगटातील होते. मृतांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी आहे. या घटनेनंतर बंगळुरूमधील जयदेव रुग्णालयात हृदयरोगाच्या तपासणीसाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढली आहे. ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या ८ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. यातील बहुतेक लोक हसन आणि आसपासच्या जिल्ह्यांतील आहेत.