ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 11:31 IST2025-10-30T11:27:55+5:302025-10-30T11:31:37+5:30
Nitish Katara Killer Sukhdev Yadav Dies In Accident: २००२ साली घडलेल्या बहुचर्चित नितीश कटारा ऑनर किलिंग प्रकरणामधील दोषी आरोपी सुखदेव यादव उर्फ पहलवान याचा अपघाती मृत्यू झाला आहे.

ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
२००२ साली घडलेल्या बहुचर्चित नितीश कटारा ऑनर किलिंग प्रकरणामधील दोषी आरोपी सुखदेव यादव उर्फ पहलवान याचा अपघाती मृत्यू झाला आहे. हा अपघातउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे मंगळवारी रात्री १०च्या सुमारास एका भरधाव कारने सुखदेव यादवच्या दुचाकीला धडक दिल्याने झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. नितीश कटारा हत्या प्रकरणात सुखदेव यादव याला कोर्टाने २० वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच हल्लीच तो तुरुंगातून सुटला होता.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुखदेव यादव आणि आणखी दोघेजण दुचाकीवरून जात असताना कुशीनगरमधील तमकुही रोड परिसरात एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, त्यात ५५ वर्षीय सुखदेव यादव याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत दुचाकीवर असलेले विजय गुप्ता आणि भगवत सिंह हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिकांनी मदतीसाठी पुढे येत जखमींनी रुग्णालयात दाखल केले. तर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
सुखदेव यादव हा दिल्लीतील बहुचर्चित नितीश कटारा हत्या प्रकरणातला एक आरोपी होता. तसेच कोर्टाने त्याला दोषी ठरवले होते. या प्रकरणी माजी खासदार डी.पी. यादव यांचा मुलगा विकास यादव आणि पुतण्या विशाल यादव यांनाही शिक्षा झाली होती. १६ फेब्रुवारी २००२ रोजी रात्री नितीश कटारा याचं गाझियाबाद येथील विवाह सोहळ्यातून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. नितीश कटारा आणि विकास यादव याची बहीण भारती यादव यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होती. ही बाब प्रतिष्ठेचा विषय करून यादव कुटुंबीयांनी नितीश कटारा याची हत्या केली होती. या प्रकरणी तिघांना २० वर्षांची शिक्षा झाली होती.