रेल्वेच्या रिटर्न तिकिटावर २० टक्के सूट; येण्या-जाण्याचा प्रवास एकत्र बुक करावा लागेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 06:57 IST2025-08-10T06:57:42+5:302025-08-10T06:57:59+5:30
फेस्टिव्हल स्पेशल आणि नियमित मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये या नव्या योजनेचा लाभ मिळेल.

रेल्वेच्या रिटर्न तिकिटावर २० टक्के सूट; येण्या-जाण्याचा प्रवास एकत्र बुक करावा लागेल
नवी दिल्ली : रेल्वेने प्रवाशांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. 'राउंड ट्रिप पॅकेज स्कीम' असे या योजनेचे नाव असून, या अंतर्गत येण्या-जाण्याचा प्रवास एकत्र बुक केल्यास परतीच्या तिकिटावर २०% सूट मिळणार आहे. सध्या ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. फेस्टिव्हल स्पेशल आणि नियमित मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये या नव्या योजनेचा लाभ मिळेल. काही गाड्यांसाठी ही योजना लागू नाही.
कोणत्या कालावधीत सूट?
योजनेची बुकिंग १४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही सूट १३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान जाणाऱ्या प्रवासासाठी आणि १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान परत येणाऱ्या प्रवासासाठी लागू असेल. राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस आणि सुविधा एक्स्प्रेस यांसारख्या प्रीमियम गाड्यांसाठी ही योजना लागू असणार नाही.
महत्त्वाच्या बाबी कोणत्या?
तिकीट एकत्र बुक करणे आवश्यक : या योजनेचा लाभ घेण्यासाठी येण्या-जाण्याची दोन्ही तिकिटे एकाच वेळी बुक करणे अनिवार्य आहे. एका बाजूचे तिकीट घेतल्यास ही सूट मिळणार नाही.
एकच ट्रेन असणे महत्त्वाचे : प्रवाशांनी एकाच ट्रेनमधून येण्या-जाण्याचा प्रवास करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्ही 'विदर्भ एक्स्प्रेस'ने गेला असाल, तर परत येतानाही 'विदर्भ एक्स्प्रेस'नेच प्रवास करावा लागेल.
समान माहिती बंधनकारक : दोन्ही तिकिटांवर प्रवाशाचे नाव, वय, बोर्डिंग स्टेशन, जाण्याचे ठिकाण व प्रवासाचा वर्ग (स्लीपर, 3AC, 2AC) यासारखी सर्व माहिती समान असणे आवश्यक आहे.